भाषा, गुन्हे आणि फेन्या

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
वेध
रेवती जोशी-अंधारे
crimes and fenny एखादी भाषा ‘बोलण्यावरून’ आणि ‘वाचण्यावरून’ सध्या आपल्याकडे बराच धुरळा उडाला आहे. विशिष्ट भाषा बोलण्याचा हा आग्रह आता दुराग्रह बनतो आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणेच आपली भाषाही सर्वसमावेशक आहे आणि म्हणूनच कालौघात आलेले बदल स्वीकारून ती अद्ययावत होत राहिलेली आहे. आता युवा पिढीने मातृभाषेत एक नवीच बाराखडी जोडून, अलगद जेन झी भाषा अस्तित्त्वात आणली. पण, जागतिक इतिहासात सगळ्याच भाषांची जडणघडण कदाचित इतकी सोपी नव्हती. रशियाच्या तुरुंगात फेन्या नावाची भाषा कैद्यांनी जन्माला घातली आणि आज ती सायबर गुन्हेगारांच्या संवादाचे माध्यम बनली आहे. अभिजाततेच्या आजच्या टप्प्यावर फेन्याच्या विकासातील टप्प्यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न!
 
 
crimes and fenny
 
 
सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव जोसेफ स्टॅलिन यांच्या गुलाग तुरुंगांमध्ये फेन्याचा जन्म झाला. ही सांकेतिक भाषा तुरुंगातील गार्डस्ना गोंधळात टाकण्यासाठी वापरली जात असे. गुन्हेगारांची ही खास भाषा बदलली आणि मुख्य रशियन भाषेतही मिसळली. फेन्याचा प्रसार होण्यामागे स्टॅलिनचा काळ आणि गुलाग व्यवस्थाच कारणीभूत ठरली. म्हणूनच ही भाषा जगातील सर्वाधिक पसरलेल्या गुप्त भाषांपैकी एक बनली.
 
ही गुन्हेगारांची भाषा शेकडो वर्षांपासून अंडरवर्ल्डमधील लोक इतरांना गोंधळात टाकण्यासाठी, अटक टाळण्यासाठी किंवा पळवाटा शोधण्यासाठी वापरत आलेत. विसाव्या शतकात सोव्हिएत तुरुंगांमध्ये या भाषेत द्वयर्थी आणि इतर भाषांमधून घेतलेले शब्द खूप वाढले. जर्मन, ग्रीक आणि यिडिश भाषांचा प्रभाव असलेली फेन्या अनेक गुप्त आणि गुंतागुंतीच्या अर्थांनी भरलेली आहे. उदाहरणार्थ, रशियनमध्ये बाबकी म्हणजे आजी पण, फेन्यामध्ये त्याचा अर्थ पैसे असाही होतो.
फेन्या भाषेमधील एकच शब्दाचे अनेक गुप्तअर्थ असू शकतात. त्याचा अर्थ केवळ ती भाषा जाणणाऱ्या लोकांनाच समजतात. पूर्वी ही भाषा तुरुंगातील रक्षकांना गोंधळात टाकण्यासाठी वापरली जात होती तसेच, आता हीच भाषा इंटरनेटवर सायबर गुन्हेगार आपले हेतू लपवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना गोंधळात टाकण्यासाठी वापरत आहेत. उदाहरणार्थ, रशियन भाषेत मायकॉप म्हणजे साधारणपणे कचरा असा अर्थ होतो. पण, फेन्या भाषेत आज त्याचा अर्थ पोलिस असा घेतला जातो. विशेषतः असा पोलिस जो डार्क वेबवरील त्या फोरममध्ये घुसखोरी करून सायबर हल्ल्यांची माहिती गोळा करतो.
जगभरात खासकरून रशियामध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे तपास करणाऱ्यांना गुन्हेगारांपेक्षा पुढे राहण्यासाठी ही गुप्त भाषा नीट समजून घ्यावी लागते. फेन्यातील सतत बदलणारे सूक्ष्म अर्थ समजून घेणं मशीनसाठीही कठीण जातं. मुळात फेन्या ही क्रिप्टोलेक्ट म्हणजेच गुप्त भाषा असून ती इतरांना गोंधळात टाकण्यासाठी, आपलं बोलणं लपवण्यासाठी किंवा गुप्त ठेवण्यासाठी वापरली जाते.
पण, आज मात्र या भाषेतील अनेक शब्द रशियन भाषेत इतके मिसळून गेले आहेत की, ते मूळचे गुन्हेगारी जगतातून आले आहेत हे अनेकांना माहितीही नसेल. एका लोकप्रिय पण वादग्रस्त सिद्धांतानुसार, या भाषेची सुरुवात ओफेनी नावाच्या रशियाभर पायी फिरून धार्मिक वस्तू विकणाऱ्यांपासून झाली. सतराव्या शतकात एका धार्मिक वादानंतर विक्रेत्यांच्या वस्तूंना धर्मविरोधी ठरवण्यात आलं. त्यामुळे या भटक्या विक्रेत्यांनी संवाद साधण्यासाठी बोलण्याची गुप्त पद्धत विकसित केली.
 
फेन्या भाषेत सुमारे 10 ते 27 हजार शब्द आहेत. झारशाहीच्या अखेरच्या काळात, समाजातील सुशिक्षित आणि बुद्धिजीवी लोकांना गुन्हेगारांच्या या गुप्त जगाविषयी खूप कुतूहल, आकर्षण वाटू लागलं. याच आकर्षणातून व्हॅगाबॉन्ड म्युझिक हा संगीतप्रकार लोकप्रिय झाला. 1922 मध्ये रशियन गृहयुद्ध जिंकून सोव्हिएत संघाची स्थापना केल्यानंतर बोल्शेविकांनी तुरुंग छावण्यांचा विस्तार केला. या छावण्यांमध्ये गुन्हेगारांसोबत सामान्य लोकांनाही ठेवल्यामुळे अनेकांना फेन्या प्रत्यक्ष ऐकण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. फेन्यातील गूढ शब्द कैद्यांमध्ये पसरले आणि तिला गुन्हेगारांमध्ये प्रमाणित स्वरूप प्राप्त झालं.
1953 मध्ये सामूहिक माफी जाहीर झाल्यामुळे 10 लाखांहून अधिक कैदी तुरुंगातून मुक्त झाले. हे छोटे गुन्हेगार मोठ्या संख्येने गुलागमधून बाहेर पडले आणि ते आपल्या घरी परतले. ते फेन्या भाषा आपल्यासोबत घेऊन आले. 1991 मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन होईपर्यंत, फेन्या ही भाषा लोककथेचा भाग बनून रुजली होती. गंमत म्हणजे, तुरुंगांमध्ये फेन्या भाषा बोलण्यावर बंदी होती, परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतः मात्र याच भाषेत बोलणं सुरू ठेवलं. 21व्या शतकाच्या सुरुवातीला फेन्या दैनंदिन भाषेत मिसळली आणि त्याच वेळी डिजिटल क्रांतीमुळे तिचा एका नव्या क्षेत्रातही विकास झाला. त्यांच्या मुद्दामहून केलेल्या चुकीच्या स्पेलिंग्स आणि रचनांमधून पडोंकी नावाची नवी स्लँग भाषा तयार झाली.crimes and fenny दर महिन्याला लाखो लोक ऑनलाईन ही भाषा वापरतात. त्यामुळे अनेक रशियन लोकांना ही भाषा समजते, पण त्यापैकी सगळेच गुन्हेगार नसतात. ही भाषा मुद्दाम रशियन भाषेचे संकेत मोडते. इंग्रजीमधून घेतलेले शब्दही वापरले जातात, पण त्यांचे अर्थ बदलून वेगळ्या अर्थाने वापरले जातात.
जेव्हा फेन्या भाषेतील शब्द सायबर जगतात दिसतात, तेव्हा त्यामागे एक वेगळाच एकत्रित प्रभाव असू शकतो. फेन्या भाषा आणि सायबर गुन्हेगारांची बोलीभाषा मिळून एक गुंतागुंतीचे आणि समजायला कठीण असे भाषिक जाळे तयार होते. या ऑनलाईन गुन्हेगारी भाषेला ते सायबर-फेन्या असेही म्हणतात. यासगळ्या पृष्ठभूमीवर आपल्याला ‘तयार’ मिळालेल्या समृद्ध मायमराठीची जपणूक करणंही जमणार नसेल तर...
.........