अनिल कांबळे,
नागपूर,
life-threatening-attack : वर्षभरापूर्वी बहिणीने पळून जाऊन प्रियकरासोबत प्रेमविवाह केला. मात्र, कुटुंबियांना त्यांचा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे तरुणीच्या भावंडांनी बहिणीच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकून प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जाहिद, मतीन, उमेर आणि साहिद अशी आरोपी भावंडांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार (२५, स्विपर क़ॉलनी) हा एका ऑक्सीजन पुरवठा करणाऱ्या कंपनीत काम करतो. त्याची ओळख १९ वर्षीय तरुणीशी झाली. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. दोघांचाही सुखी संसार सुरु असून सध्या ती तरुणी तीन महिन्यांची गर्भवती आहे. बुधवारी सकाळीच आरोपी जाहिद, मतीन, उमेर आणि साहिद हे तुषारच्या घरी आले. गर्भवती बहिणीला सोबत नेण्याचा प्रयत्न करायला लागले. मात्र, तरुणी त्यांच्यासोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे तुषारने त्यांना विरोध केला. त्यामुळे त्या चारही भावंडांनी तुषारला जबर मारहाण केली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.