24 तास धोक्याचे! कोसळणार मुसळधार पाऊस

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मुंबई
maharashtra heavy rain अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 तासांत संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून, किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, तर सखल भाग पाण्याखाली गेले. या पावसामुळे राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले, तरी अवघ्या पाच ते सहा दिवसांत झालेल्या दमदार पावसाने जून महिन्याच्या सरासरी पावसाची भरपाई केली आहे.
 

maharashtra heavy rain update: rivers overflow, dams fill up and yellow alert issued in several districts 
इशारा दिला
राज्यातील काही भागांमध्ये आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरासाठी भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, केरळ किनारपट्टी परिसरात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी होत असून राज्यातून पाऊस ओसरत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मान्सून आता संपूर्ण देशभर सक्रिय झाला असून एक-दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. जुलै महिन्यातही राज्यात चांगल्या पावसाची शक्यता असून आजही काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या चांदोली धरण 58.66 टक्के भरले असून त्यामध्ये 20.18 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. अतिवृष्टीमुळे वारणा नदीने काही दिवसांपूर्वी धोक्याची पातळी गाठली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने नदीची पाणीपातळी आता कमी होऊ लागली असून नदीकाठच्या परिसरातील पूरस्थिती हळूहळू निवळत आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातही मुसळधार पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. वडज धरणातून मीना नदीपात्रात 10 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने नदीने रौद्र रूप धारण केले. नारायणगाव येथील मेहेर पूल, नेवकर पूल, केटी बंधारे आणि आठवडे बाजार तळ पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनीत पाणी साचले असून, ग्रामपंचायत नारायणगाव आणि वारुळवाडी यांच्या माध्यमातून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.