ट्रम्प यांच्या जीवाला मोठा धोका?

इराणच्या कथित कटामुळे अमेरिकेत खळबळ

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Major threat to Trump's life अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेच्या माध्यमांमध्ये समोर आलेल्या वृत्तांमुळे खळबळ उडाली आहे. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी अमेरिकेला दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचा कथित कट रचला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या वृत्ताला अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. माध्यमांतील माहितीनुसार, इस्रायलकडून मिळालेल्या गुप्त माहितीत ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत संभाव्य धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.
 
 
 
trump
२०२० मध्ये अमेरिकेच्या कारवाईत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कुद्स फोर्सचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेतली जात असल्याचे वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेदरम्यान ट्रम्प यांच्याविरोधात घोषणाबाजी झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील आपण इराणच्या लक्ष्य यादीत असल्याचे म्हटले आहे. "मी त्यांच्या लक्ष्य यादीत आहे. मी अमेरिकेचा नेता असल्यामुळे ते मला संपवू इच्छितात. आतापर्यंत मी नशिबवान ठरलो आहे, मात्र हे कायम असेलच असे नाही," असे वक्तव्य त्यांनी केल्याचे वृत्त आहे.
 
 
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेलाही खीळ बसल्याचे सांगितले जात आहे. युद्धविरामाच्या दिशेने हालचाली सुरू असतानाच दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात दोन जहाजांवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने इराणमधील काही भागांवर हवाई हल्ले केल्याचे वृत्त आहे. या कारवाईत एका रेल्वे पुलालाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही दिसून येत असून, कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.