मंजूरीपूर्वीच कालव्यावर ‘मातोश्री पांदण रस्ता’!

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुखपूर येथील प्रकार : चौकशीची मागणी
 
गोंदिया, 
‘matoshri pandan rasta’ शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी राबविण्यात येणार्‍या मातोश्री पांदण रस्ता योजनेच्या कामात गोरेगाव तालुक्यात गंभीर अनियमितता समोर आली आहे. बोरगाव-सुखपूर येथील पाठबंधारे विभागाच्या कालव्यावर आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळण्यापूर्वीच पांदण रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, तब्बल 80 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारासह जबाबदार अधिकार्‍यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 
 
pandan rasta
 
मातोश्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना शेतात जाता यावे, यासाठी रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दरम्यान, बोरगाव, सुखपूर, नवरगाव, बघोली, चोपणटोली आदी गावांतील शेतजमिनींना सिंचनाचा लाभ देता यावा यासाठी पाठबंधारे विभागाच्या गुमडोह जलाशयांतर्गत कालवा देण्यात आला आहे. कालव्यावर कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी संबंधित विभागाचे नाहरकत घेणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित एजेंसी किंवा कंत्राटदाराने अशी कोणतीही मंजूरी मिळण्यापूर्वीच थेट कालव्यावरच मातोश्री पांदण रस्त्याचे बांधकाम सुरु केले आहे. त्यात जवळपास 80 टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याने पाठबंधारे विभागाकडून या कामाला थांबविण्यात आले आहे. असे असले तरी नाहरकत किंवा कोणतीही मंजूरी नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झाले कसे? असा प्रश्न उपस्थित होत असून मातोश्री पांदन रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून सुमारे 25 लाख रुपयांपर्यंतचा निधी मंजूर होत असल्याने आर्थिक लाभाच्या उद्देशाने नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मंजूरीची वाट न बघता कंत्राटदाराकडून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असल्याच्या चर्चा परिसरात रंगल्या आहे.
 
 

बांधकाम करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल, मात्र, तशी प्रक्रीया पार पडली अथवा नाही याची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- सैलेश गायधने, उपविभागीय अभियंता, जि.प. सार्व. बांधकाम विभाग गोंदिया

संबंधित कामाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव प्राप्त झाला आहे. मात्र, प्रस्तावात काही त्रुटी असल्याने अद्याप मंजुरीचे पत्र देण्यात आलेले नाही.
- राजीव कुरेकार, कार्यकारी अभियंता, गोंदिया पाठबंधारे विभाग, गोंदिया