‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये परतली मोनिका राठी

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मुंबई
monika rathi मुख्य कलाकाराच्या प्रकृतीमुळे अनेकदा मालिकेच्या कथानकात बदल करावे लागतात. मात्र, त्या बदलांनंतरही प्रेक्षकांचे मनोरंजन कायम राखणे ही निर्मात्यांसमोरील मोठी जबाबदारी असते. ‘सन मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेने हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. सध्या मालिका एका रंजक टप्प्यावर पोहोचली असून कथानकात आर्यनने मंजूच्या डोळ्यांत लाल तिखट टाकल्यामुळे तिची दृष्टी गेल्याचे दाखवण्यात आले. या कथानकामुळे काही दिवस मंजू मालिकेत दिसली नसल्याने अनेक प्रेक्षकांनी अभिनेत्री मोनिका राठीने मालिका सोडल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता मंजू पुन्हा प्रत्येक भागात दिसू लागल्याने प्रेक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
 

monika rathi returns to inspector manju after eye surgery, clears exit rumours 
याबाबत अभिनेत्री मोनिका राठीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, “प्रेक्षकांची लाडकी मंजू कुठेही गेलेली नाही. माझ्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे मला दहा दिवसांची सुट्टी घ्यावी लागली. जवळपास महिनाभर आधीच मी प्रोडक्शनला याबाबत कल्पना दिली होती. त्यामुळेच मालिकेत आर्यन मंजूच्या डोळ्यांत लाल तिखट टाकतो आणि तिची दृष्टी जाते, असा ट्रॅक लिहिण्यात आला. सुट्टीवर जाण्यापूर्वी डोळ्यांवर पट्टी बांधून माझे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले होते. प्रोडक्शनने माझ्यासाठी स्वतंत्र कॅमेऱ्याचीही व्यवस्था केली होती. गेली तीन वर्षे ही मालिका सुरू आहे. या काळात मी इतका मोठा ब्रेक कधीच घेतला नव्हता. मात्र, वैद्यकीय आणीबाणीमुळे हा निर्णय घ्यावा लागला. अशा वेळी माणसं कळतात असं म्हणतात आणि ते मी स्वतः अनुभवलं. मुख्य भूमिका असल्यामुळे जवळपास प्रत्येक दृश्यात मंजू असते. माझ्याशिवाय चित्रीकरण कसे करायचे, याचे उत्तम नियोजन संपूर्ण टीमने केले. विशेष म्हणजे, मी सुट्टीवर असताना कामासाठी कुणाचाही फोन आला नाही. त्याऐवजी सोशल मीडियावर मात्र प्रेक्षकांचे भरभरून संदेश येत होते. मी मालिका सोडली, असा त्यांचा गैरसमज झाला होता. त्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे माझ्यावरील प्रेम अनुभवायला मिळाले.”
 
 
पुढे बोलताना मोनिका राठी monika rathi  म्हणाली, “आता मी पुन्हा चित्रीकरणासाठी परतले आहे. सेटवर प्रत्येकजण माझी विशेष काळजी घेतो. मला नियमित डोळ्यांत ड्रॉप्स टाकावे लागतात आणि त्याची आठवणही सेटवरील प्रत्येकजण करून देतो. मी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोन वापरला तरी लगेच ‘मंजू, फोन ठेव’ असे प्रेमाने सांगितले जाते. या मालिकेमुळे मला खूप चांगली माणसंही मिळाली आहेत. या कठीण प्रसंगी प्रोडक्शन आणि चॅनेलने मला ज्या पद्धतीने सांभाळून घेतले, त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मंजू दृष्टी गेल्याचे नाटक करत असल्याचे तिने सत्याला सांगितले आहे. त्यामुळे आर्यनचा डाव उधळून लावण्यासाठी ती सज्ज झाली आहे. यापुढील प्रत्येक भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, याची मला खात्री आहे.”