मुंबई
mumbai thar hit and run मुंबईच्या रस्त्यांवर एका भरधाव महिंद्रा थार कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हरियाणा नोंदणी क्रमांक असलेल्या काळ्या रंगाच्या थार कार चालकाने मुंबईतील गर्दीच्या रस्त्यावर ज्या पद्धतीने वाहन चालवले, ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नियंत्रणाबाहेर गेलेल्या या कार चालकाने एका पाठोपाठ एक अशा दोन दुचाकींना धडक दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये HR 98 X 5101 क्रमांकाची महिंद्रा थार कार रस्त्यावर बेफिकीरपणे चालताना दिसत आहे. अचानक या एसयूव्हीने पुढे जाणाऱ्या एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. मात्र, अपघातानंतरही चालकाने वाहन न थांबवता कार पुढे नेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.यानंतर काही अंतरावर या थार चालकाने आणखी एका दुचाकीला धडक दिली. दुसऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतरही चालकाने घटनास्थळी न थांबता वेगाने तेथून पळ काढला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ एका व्यक्तीने शूट करून सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.या हिट अँड रनच्या घटनेनंतर सोशल मीडिया युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. बेपर्वाईने वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित थार चालकाचा शोध सुरू केला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
व्हिडीओ : सौजन्य सोशल मीडिया
दरम्यान, इंटरनेट युजर्सनी आरोपी चालकाला त्वरित अटक करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा न करता वाहन चालवणाऱ्या बेफिकीर चालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे रस्ते सुरक्षेबाबतचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.