आता नगर परिषदेला ‘नोटीस’ कोण बजावणार?

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
- गोंदियाकरांचा सवाल : इतरांना नोटीस बजावणार्‍या न.प.चीच इमारत धोकादायक
 
प्रमोदकुमार नागनाथे
गोंदिया, 
Nagar Parishad Gondia Building शहरातील धोकादायक व जीर्ण इमारतींवर कारवाई करत संबंधित मालकांना नोटिसा बजावणार्‍या नगर परिषदेची स्वतःचीच इमारत आजघडीला अत्यंत जीर्ण अवस्थेत असून ती कधीही दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. त्यात नगर परिषदेच्या काही शाळांच्या इमारतीही धोकादायक ठरू लगल्या असून काही शाळांचे नव्याने बांधकाम तर काही शाळांना दुरुस्तीची गरज आहे. त्यामुळे इतरांना नोटीस देण्यापूर्वी नगर परिषद प्रशासनाने स्वतःचीच इमारत सुरक्षित करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
 
 
gondia
 
नगर परिषदेच्या सर्वेक्षणानुसार शहरात 68 इमारती धोकादायक व जीर्ण अवस्थेत आहेत. यात संबंधित मालकांना नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र, ज्या नगर परिषदेतून या नोटिसा निघतात, त्याच कार्यालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. छत, स्लॅब आणि भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून इमारतीतील काही भाग धोकादायक बनला आहे. याची प्रचिती चार दिवसांपूर्वी येथील टॅक्स व लेखा परिक्षण विभागातील कोसळलेल्या छतावरून येते. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी-कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत असल्याचे दिसत असून विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे नगर परिषदेच्या अखत्यारीतील 14 शाळांपैकी काही शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्यापैकी काहींना पाडून नव्याने बांधकाम करण्याची तर काहींना दुरुस्तीची गरज आहे. शिक्षण विभागाने संबंधित इमारतींच्या दुरुस्तीचा तसेच नव्या इमारती उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. एका बाजूला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जीर्ण इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना दुसर्‍या बाजूला नगर परिषदेच्या स्वतःच्या इमारती आणि शाळांची अवस्था बिकट होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जीर्ण इमारतींच्या मालकांना नोटिस बजावणार्‍या नगर परिषदेलाच आता नोटीस बजावण्याची वेळ आली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
 
 

कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याची माहिती वरिष्ठांना सादर करण्यात आली असून परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नगर परिषदेचे काही विभाग शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातील इमारतीत हलविण्यात आले आहे. तर काही विभागाचे कामकाज टाउन शाळेतून केले जात आहे.
बी. एन. झलके, उपमुख्याधिकारी, न.प.गोंदिया