अनिल कांबळे,
नागपूर,
nagpur-police : गुन्हेगारीच्या विळख्यात अडकण्यापूर्वीच अल्पवयीन मुलांना आणि युवकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी नागपूर पोलिसांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसलेल्या, मात्र सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांच्या संपर्कात आढळून आलेल्या अल्पवयीन मुले-मुली व युवकांचे समुपदेशन करून त्यांना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी आयपीएस विनीता साहू यांनी कपीलनगर पोलिस ठाण्यात जाऊन युवकांना मार्गदर्शन केले.
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या ‘मिशन समूपदेशन’ नागपूर पोलिसांच्या प्रतिबंधात्मक पोलिसिंग आणि समुदायाभिमुख उपक्रमांतर्गत हा समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी युवकांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी, विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रामाणिक मार्गाने करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. सकारात्मक मार्ग स्वीकारणाऱ्या युवकांना पोलिस प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही अधिकाऱ्यांनी दिली. या उपक्रमात कपीलनगरचे ठाणेदार सतीश आडे यांनी सहभाग घेतला.
समुपदेशनादरम्यान अमली पदार्थांचे व्यसन, अवैध शस्त्रे बाळगणे तसेच गुन्हेगारांच्या टोळ्यांशी संबंध ठेवण्याचे गंभीर कायदेशीर आणि वैयक्तिक परिणाम युवकांना समजावून सांगण्यात आले. अशा प्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले. सराईत गुन्हेगार जाणूनबुजून अशा अल्पवयीन आणि युवकांना लक्ष्य करतात, ज्यांच्या गुन्ह्यांचा मागमूसही नसतो आणि त्यांना सहजपणे प्रभावाखाली आणण्यात येते, त्यामुळे अशा युवकांना गुन्ह्यात अडकण्यापूर्वीच नागपूर पोलिस प्रतिबंध घालणार आहेत. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर पोलिस केवळ सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईवरच नव्हे, तर युवकांची गुन्हेगारी टोळ्यांमध्ये होणारा सहभाग रोखण्यावरही विशेष भर देत आहेत. "योग्य वेळी युवकांना गुन्हेगारीच्या चक्रात अडकण्यापासून रोखले, तर भविष्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात कमी करता येईल आणि संघटित गुन्हेगारीचे जाळेही कमकुवत होईल," असेही त्यांनी नमूद केले. समुदायाभिमुख पोलिसिंगच्या माध्यमातून लवकर हस्तक्षेप, समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या साहाय्याने गुन्हेगारी संघटनांकडून युवकांचा होणारा गैरवापर थांबविण्याचा नागपूर पोलिसांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
"रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार स्वतः पडद्यामागे राहून या युवकांकडून मारहाण, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्हे करून घेतात. त्यामुळे अशा धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या युवकांची वेळेत ओळख करून त्यांचे समुपदेशन करणे, त्यांना शिक्षण, कौशल्य विकास आणि वैध रोजगाराच्या दिशेने वळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे,"
- विनीता साहू (अप्पर पोलिस आयुक्त)