भगवान कृष्णांचा दाखला देत निदा खानला जामीन!

धर्मांतर प्रकरणात निदा खानlला जामीन

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
नाशिक,
nida khanla land in conversion case नाशिक जिल्ह्यातील गाजलेल्या कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशात भगवान कृष्णांच्या जन्माचा संदर्भ देत गर्भवती महिलेला तुरुंगात प्रसूतीसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, अशी भूमिका स्पष्ट केली. या आदेशामुळे न्यायालयाच्या निरीक्षणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. निदा खान सध्या पाच महिन्यांची गर्भवती असून, तिच्यावर एका सहकाऱ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी कथित धार्मिक दबाव टाकल्याचा आरोप आहे. तसेच हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी तिला अटक केली होती.
 
 
 
nida
विशेष न्यायाधीश के. जी. जोशी यांनी जामीन मंजूर करताना आपल्या आदेशात नमूद केले की, अर्जदार पाच महिन्यांची गर्भवती असल्याबाबत कोणताही वाद नाही. भगवान कृष्णांचा जन्मही कारागृहात झाला होता. अशा प्रकारची प्रसूतीची वेळ कोणत्याही महिलेला तुरुंगात अनुभवावी लागू नये किंवा त्यातून निर्माण होणारा सामाजिक कलंक सहन करावा लागू नये. नवजात बालकाच्या हिताचा विचार करून न्यायालयाने न्यायिक विवेकाधिकाराचा वापर करत जामीन मंजूर करणे योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवले.न्यायालयाने आदेशात हेही स्पष्ट केले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका प्रकरणातच निदा खानविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, २६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत इतर सात आरोपींविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपास यंत्रणेनुसार, निदा खानने काही सहकाऱ्यांना बुरखे व धार्मिक पुस्तके दिली तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये धार्मिक ॲप्स स्थापित केल्याचा आरोप आहे. याशिवाय, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा उल्लेखही पोलीस प्रथम माहिती अहवालात करण्यात आला आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने गर्भधारणा आणि नवजात बालकाच्या हिताचा विचार करत तिला जामीन मंजूर केला.