नाशिक,
Ninth-grade student gives birth to a baby नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात, सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने जिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेला अल्पवयीन मुलगा, जो तिचाच नातेवाईक असल्याची माहिती आहे, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर बाल न्याय कायद्यानुसार आणि पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आश्रमशाळेत राहणाऱ्या दोघांची भेट कशी झाली, त्यांच्यातील संबंधांची माहिती प्रशासनाला का मिळाली नाही, विद्यार्थिनी गर्भवती असतानाही ते इतके दिवस कोणाच्या लक्षात कसे आले नाही, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींची नियमित आरोग्य तपासणी होत असल्याचा दावा केला जात असला, तरी या घटनेमुळे त्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दर १५ दिवसांनी आरोग्य तपासणी होत असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यानंतरही विद्यार्थिनीची गर्भावस्था लक्षात न आल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
या संदर्भात नाशिक आदिवासी विकास भवनाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी सांगितले की, प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संबंधितावर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका तपासली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.