आठ वर्षीय चिमुरडीशी अश्लील कृत्य

- २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी अटकेत

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
obscene-act-with-a-little-girl : हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ वर्षीय चिमुरडीशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी १५ दिवसांच्या अथक तपासानंतर अटक केली आहे. कुबेर अनिल पोहाने (वय २०, रा. स्वामीपुरम सोसायटी, चिंचभवन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील पठाणपुरा वॉर्ड येथील रहिवासी आहे.
 
 
NGP
 
ही घटना २४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली. पीडित मुलगी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी गेली होती. तेथून परतत असताना मोपेडवर आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी बोलून तिला सोबत नेले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले. ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिला घराजवळ सोडून पलायन केले. पीडितेचे आई-वडील कामानिमित्त तीन दिवस घराबाहेर असल्यामुळे तक्रार नोंदविण्यास उशीर झाला. त्यानंतर मुलीच्या जबाबावरून हुडकेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मानेवाडा चौक, शताब्दी नगर चौक, जयप्रकाश नगर, जयताळा, हिंगणा रोड, वायसीसी कॉलेज चौक आदी परिसरातील २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासातून आरोपीच्या मोपेडचा नोंदणी क्रमांक हाती लागला. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अवघ्या १५ दिवसांत त्याला अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे, पोलिस निरीक्षक पवन रामटेके तसेच हुडकेश्वर पथकाने केली.