निकृष्ट बियाण्याच्या देवळी तालुक्यात १०० हून अधिक तक्रारी
दुबार पेरणीचे संकट
दिनांक :10-Jul-2026
Total Views |
देवळी,
substandard seeds in deoli taluka आभाळाने साथ दिली पण बियाण्याने दगा दिला, अशी हतबल भावना सध्या तालुक्यातील शेतकर्यांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. निकृष्ट सोयाबीन बियाण्यामुळे तालुक्यातील शेकडो एकरांवरील पिके उगवलीच नसून आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या आशेने शेतकर्यांनी बूस्टर कंपनीचे कबड्डी व खो-खो तसेच यशोदा सिड्सचे हनीबेझर या सोयाबीन बियाण्याची खरेदी करून पेरणी केली. पावसानेही समाधानकारक हजेरी लावली. मात्र, अनेक शेतांमध्ये बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या मेहनतीवर अक्षरश: पाणी फेरल्या गेले. तक्रारीनंतर यशोदा सिड्सने काही शेतकर्यांना पर्यायी बियाणे उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जात असले तरी अनेकांना अजूनही बियाणे मिळालेले नाही. दुसरीकडे बूस्टर कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.
शेतकर्यांना केवळ नवीन बियाणे दिल्याने प्रश्न सुटणार नसल्याची भावना व्यक्त केली. पेरणीसाठी झालेला खर्च, मशागतीचा खर्च, मजुरी, खते आणि वाया गेलेली मेहनत याची भरपाई कोण करणार, असा संतप्त सवाल शेतकर्यांनी केला आहे. आता दुबार पेरणीसाठी पुन्हा हजारो रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. दरम्यान, कृषी विभागाचे अधिकारी व कृषी शास्त्रज्ञ प्रभावित शेतांमध्ये जाऊन पंचनामे व पाहणी करीत आहेत.substandard seeds in deoli taluka या पंचनाम्यांच्या आधारे शेतकर्यांना न्याय मिळावा, अशी शेतकर्यांची मागणी आहे. बियाण्याने बळीराजाचे स्वप्न उद्ध्वस्त केले. आता शासनाने आणि संबंधित कंपन्यांनी शेतकर्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याची वेळ आली आहे, अशी भावना देवळी तालुक्यात सर्वत्र व्यक्त होत आहे.