आळंदी
pandhari-wari संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या असून, टाळ-मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी भक्तिभावाने वाटचाल करत आहेत. वारी हा केवळ भक्तीचा सोहळा नसून अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वर्षभराच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार ठरत आहे.
pandhari-wari वारीच्या काळात टाळ, मृदुंग, वीणा, भगवे झेंडे, तुळशीमाळा, फेटे, तसेच विविध पूजासाहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या वस्तूंची तयारी कारागीर आणि व्यापारी काही महिन्यांपासून करत असतात. वारी सुरू होताच या साहित्याला मोठी मागणी निर्माण होते आणि याच विक्रीतून अनेकांची वर्षभराची कमाई होते.
महिन्याभरात लाखोंची उलाढाल...
pandhari-wari आळंदी येथील व्यापारी बाळासाहेब गुरव गेल्या अनेक वर्षांपासून पखवाज, टाळ, मृदुंग, वीणा आणि हार्मोनियमच्या विक्रीचा व्यवसाय करत आहेत. गेल्या वर्षापासून त्यांनी या वाद्यांची निर्मितीही सुरू केली आहे. वारीच्या काळात विशेषत: वीणा आणि टाळ यांना सर्वाधिक मागणी असते. वर्षभरात जितकी विक्री होत नाही, तितकी केवळ वारीच्या दोन महिन्यांत होत असल्याचे ते सांगतात. या कालावधीत लाखो टाळ आणि विणा यांची विक्री होत असल्याची माहिती गुरव यांनी दिली.
pandhari-wari वारीच्या काळात छोट्या कारागिरांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांना रोजगार मिळतो. वाढत्या मागणीमुळे वाद्यांच्या किमतीतही लक्षणीय वाढ होत असल्याचे गुरव सांगतात. वारीपूर्वी 300 रुपयांना मिळणारे टाळ वारीच्या काळात 500 रुपयांपर्यंत विकला जातो. या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 5 ते 6 लाख रुपयांची उलाढाल होते.