एसआयआर'च्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओ विरोधात गुन्हा दाखल

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
Program for Review (SIR) निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी वर्धा नगर परिषदेतील कर संग्रहक तथा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नरेश रेवते यांच्याविरोधात वर्धा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जूनपासून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन मतदारांचे सर्वेक्षण, नोंदणी फॉर्म संकलन, डिजिटायझेशन आणि वितरणाची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
sir
 
वर्धा विधानसभा मतदारसंघ क्रमांक ४७ अंतर्गत मतदार यादी भाग क्रमांक २७० मध्ये बीएलओ म्हणून कार्यरत असलेले नरेश रेवते यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. निवडणूक विभागाकडून या कार्यक्रमाचा दररोज आढावा घेतला जात असताना संबंधित भागात आवश्यक काम करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत रेवते यांना तीन वेळा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्या कामकाजात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात वर्धा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा वर्धा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी दीपक कारंडे यांनी कळविले आहे.