‘फौजी’च्या सेटवर राजेश शर्मा यांच्या प्रकृतीने वाढवली चाहत्यांची चिंता, नेमकं काय घडलं?

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मुंबई
rajesh sharma चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. अभिनेता प्रभास यांच्या बहुचर्चित ‘फौजी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांना विषारी कीटक किंवा कोळ्याने डंख मारल्याने त्यांची प्रकृती गंभीर बिघडली आहे. सुरुवातीला किरकोळ वाटलेल्या या घटनेनंतर त्यांची तब्येत अचानक खालावली असून सध्या दक्षिण कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 

rajesh sharma hospitalized after poisonous insect bite during fouji shoot, akshay kumar shares emotional message 
या घटनेची माहिती अभिनेत्री सुदीपा चटर्जी यांनी राजेश शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सोशल मीडियावर दिली. त्यांच्या माहितीनुसार, रामोजी फिल्म सिटी येथे ‘फौजी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर राजेश शर्मा हे सेटजवळील दाट झाडीजवळ स्थानिक तंत्रज्ञांशी संवाद साधत असताना त्यांना एका विषारी कीटकाने किंवा कोळ्याने डंख मारला. सुरुवातीला त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही आणि तातडीने वैद्यकीय उपचारही घेतले नाहीत. मात्र, काही तासांतच त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड होऊ लागला.कोलकात्याकडे जाणाऱ्या विमानप्रवासादरम्यान त्यांच्या उजव्या पायात तीव्र वेदना, उच्च ताप आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तातडीने दक्षिण कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उजव्या पायाच्या बोटांपासून गुडघ्यापर्यंत संसर्ग वेगाने पसरला असून मोठे फोड आले आहेत. याशिवाय रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका निर्माण झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल होऊन एक दिवसाहून अधिक काळ उलटला असला तरी त्यांना अजूनही तीव्र ताप, श्वास घेण्यास अडचण आणि संसर्गाचा त्रास कायम असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर राजेश शर्मा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “शूटिंगदरम्यान किडा चावल्यानंतर माझा प्रिय मित्र राजेश याच्या तब्येतीबद्दल ऐकून खूप काळजी वाटली. महादेवाच्या कृपेने तो लवकर पूर्णपणे बरा व्हावा, हीच प्रार्थना. लवकर बरा हो मित्रा… अजून सोबत बसून खूप हसायचं आहे.” अक्षय कुमार आणि राजेश शर्मा यांनी ‘स्पेशल 26’, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘लक्ष्मी’ आणि आगामी ‘भूत बंगला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहते तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना व्यक्त केल्या आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.