शिवशाहीचा प्रवास संपणार

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
३१ पैकी १६ बसेसचे रूपांतर हिरकणीत तर १५ होणार 'लालपरी’ 
नागपूर, 
ST Corporation Shivshahi एसटी महामंडळाच्या शिवशाही बसेसमध्ये तांत्रिक बिघाड, वातानुकूलित यंत्रणा बंद व अन्य कारणांमुळे प्रवाशांनी शिवशाही बसकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात ३१ शिवशाही बसेसपैकी आतापर्यंत १६ बसेसचे निमआराम हिरकणीमध्ये रूपांतर झाले आहे. आगामी काही दिवसात उर्वरित १५ शिवशाही 'लालपरी' होणार असल्याने नागपूर विभागातून शिवशाहीचा प्रवास संपणार आहे.
 
 
shivshashi
 
प्रवाशांना वातानुकूलित व आरामदायी सेवा देण्यासाठी एसटी महामंडळातर्फे शिवशाही बसेस सुरू केल्या; परंतु शिवशाही बसमध्ये विविध कारणांमुळे बंद पडण्याचे प्रकार वाढले. तांत्रिक बिघाड, वातानुकूलित यंत्रणा बंद व अन्य कारणांमुळे प्रवाशांनी शिवशाही बसचे प्रवासी कमी झाले. त्यामुळे आता एसटी महामंडळाने शिवशाही बसेसचे निमआराम हिरकणी व साध्या 'लालपरी'मध्ये रूपांतर करण्याचे धोरण आखले आहे. .
शिवशाहीच्या उत्पन्नावर परिणाम
खाजगी ट्रॅव्हल्सना टक्कर देण्यासाठी २०१७ मध्ये राज्यात शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्यात नागपूर विभागात ३१ वातानुकूलित शिवशाही बसेस मिळाल्या. मात्र शिवशाहीमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड, एसी प्रणालीमुळे इंजीनवर अतिरिक्त ताणामुळे बसचा वेग कमी, प्रवासादरम्यान बस बंद पडणे, अशा तक्रारीही समोर आल्या. परिणामी प्रवाशांची संख्या कमी होण्यासह उत्पन्नावरही विपरीत परिणाम झाला. त्यामुळे महामंडळाने शिवशाही बसेस भंगारात काढण्याऐवजी त्यातील वातानुकूलित यंत्रणा काढून व अंतर्गत रचनेत बदल करून सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
 
 
शिवशाही आता नव्या स्वरूपात
नागपूर विभागातील ३१ शिवशाही बसेसचे हिंगणा येथील कार्यशाळेत रूप बदलविण्यात येत आहे. आतापर्यंत १६ शिवशाही बसमधील वातानुकूलित यंत्रणा काढून व अंतर्गत रचना व रंगसंगतीत बदल करून निमआराम हिरकणी बसेमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. १० शिवशाही बसेसचे स्वरूप बदलून 'लालपरी' मध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. पाच शिवशाही धावत असून त्यांचेही 'लालपरी' मध्ये रूपांतर होणार आहे. त्यामुळे भविष्यात नागपूर विभागातून वातानुकूलित शिवशाही बससेवा पूर्णपणे बंद होईल आणि निमआराम हिरकणी आणि 'लालपरी’ रूपात धावताना दिसेल शिवशाही बसेस नव्या स्वरूपात सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांना नियमित सेवा देण्यास महामंडळाला मदतच होईल, असा विश्वास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.