वाशीम,
Tonggaon - Dhumka Toll Plaza वाशीम जिल्ह्यातील तोंडगाव - धूमका टोलवर न्यायालयाच्या आदेशाने अधिकार्यांनी धडक कारवाई करत जप्तीची कारवाई आज, १० जुलै रोजी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे टोल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जप्तीची संपूर्ण प्रक्रिया पंचनामा व कायदेशीर नियमांचे पालन करून पार पाडण्यात आली. न्यायालयाच्या आदेशालाही जर सरकारी यंत्रणाच केराची टोपली दाखवत असेल तर न्यायालयाचा हातोडा किती कठोर असू शकतो याच जिवंत उदाहरण आज, १० जुलै रोजी वाशीममध्ये पाहायला मिळाले.
जमीन अधिग्रहणाचा वाढीव मोबदला न दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कोट्यवधी रुपयाची मालमत्ता असलेला तोंडगाव टोल प्लाझा न्यायालयाने थेट जप्त केला. जप्ती अधिकार्यांनी टोल प्लाझावर नोटीस लावून दवंडी देऊन ही कारवाई केली. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार जप्ती अधिकारी जितेंद्र नेमाने यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचा टोल प्लाझा जप्त करुन न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली.
वाशीम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृषक जमिनीतून राष्ट्रीय महामार्गाची उभारणी झाली. मात्र, मोबदला देताना त्यांच्या जमिनीतील रस्ते आणि खुल्या जागेची किंमतच ग्राह्य धरली गेली नाही. शिवाय प्लॉटचाही मोबदला कमी दराने देण्यात आल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. अन्यायाविरुद्ध त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि न्यायालयानेही त्यांच्या दाव्याला मान्यता दिली.
६ जुलै रोजी न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे करण्याचे स्पष्ट आदेश दिले. मात्र, आदेशानंतरही मोबदला न दिल्याने न्यायालयाने थेट जप्तीचे आदेश काढले. त्या आदेशाची अंमलबजावणी आज, १० जुलै रोजी तोंडगाव टोल प्लाझावर जप्तीची कारवाई करण्यात आली. तोंडगाव टोल प्लाझावरील ही जप्ती केवळ एका शेतकर्याच्या विजयाची नाही. तर न्यायालयाच्या आदेशापुढे कुणीही मोठ नसत, हा स्पष्ट संदेश देणारी कारवाई ठरली आहे.