मुंबई,
Tourists banned from Andharban trek. पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या दऱ्या, गडकिल्ले आणि निसर्गरम्य ट्रेकिंग मार्गांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदाच्या हंगामात ट्रेकप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरातील अत्यंत लोकप्रिय अंधारबन ट्रेक वन विभागाने पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधारबन परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि पाण्याचा प्रवाह ट्रेक मार्गावर पसरला आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
अंधारबन हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय जंगल ट्रेकपैकी एक मानला जातो. दाट जंगलामुळे सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे या परिसराला ‘अंधारबन’ किंवा ‘डार्क फॉरेस्ट’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी विशेषतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हजारो ट्रेकर्स येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. वन विभागानेदिलेल्या माहितीनुसार, सध्या या परिसरात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणताही पर्यटक अडकलेला नाही. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेक मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
ताम्हिणी घाटातील पिंपरी गावातून सुरू होणारा हा ट्रेक सुमारे १३ किलोमीटर लांबीचा आहे. पुण्यापासून साधारण ७० किलोमीटर, तर मुंबईपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर असलेला हा मार्ग चार ते सहा तासांत पूर्ण होतो. सुमारे २,१६० फूट उंचीवरून सुरू होणारा हा ट्रेक भीमा नदीच्या जलप्रवाहाजवळ संपतो. धबधबे, दाट हिरवळ, धुक्याने वेढलेले जंगल आणि छोट्या ओढ्यांमुळे अंधारबन ट्रेकला पावसाळ्यात विशेष पसंती मिळते. मात्र यंदा सुरक्षिततेच्या कारणास्तव ट्रेकप्रेमींना वन विभागाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.