पंढरपूर
pandharpur राज्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र पंढरपूर नगरीत सध्या आषाढी वारीचे वेध लागले आहेत. विठूरायाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक भक्त मोठ्या आस्थेने आणि श्रद्धेने तुळशीची माळ खरेदी करतो. मात्र, गेल्या काही वर्षांत पंढरपुरात चायना मेड तुळशी माळांचा सुळसुळाट झाला असून, याचा मोठा फटका पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने तुळशीच्या माळा बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांना बसला आहे. परिणामी, या कारागिरांवर आता बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात अधिक माहिती सतीश प्रकाश टमटम यांनी दिली.
pandharpur आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळशी माळा बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र, बाजारात स्वस्त आणि हुबेहूब दिसणाऱ्या चायना माळांची आवक वाढल्याने स्थानिक कारागिरांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वी पंढरपुरात पारंपरिक पद्धतीने तुळशीच्या माळा बनवणारे 300 ते 400 कारागीर कार्यरत होते. मात्र, चायना माळांच्या आक्रमणामुळे ही संख्या आता अवघ्या 60 वर आली आहे, अशी खंत पारंपरिक तुळशी माळा व्यावसायिक सतीश प्रकाश टमटम यांनी व्यक्त केली.
pandharpur वारकरी संप्रदायात तुळशी माळेचे महत्त्व आणि शास्त्रीय कारणे
भागवत धर्मात आणि वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अत्यंत पवित्र स्थान आहे. विठुरायाला तुळस प्रिय आहेच, पण त्यासोबतच ही माळ गळ्यात घालण्यामागे अनेक शास्त्रीय कारणे आणि फायदे आहेत. तुळस ही सात्विकता, मांगल्यता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तुळशीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. वारकऱ्यांच्या गळ्यात विठोबाचे नाम घेत रुळणारी ही 108 मण्यांची माळ निस्सीम भक्तीचे प्रतीक मानली जाते. तुळशीची माळ धारण करणाऱ्या भाविकाला काही कडक नियम आणि तत्वे पाळावी लागतात. ही माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात, अशी वारकèयांची गाढ श्रद्धा आहे.
pandharpur पारंपरिक व्यवसायाला राजाश्रयाची गरज
वारकèयांची हीच अथांग श्रद्धा लक्षात घेऊन वर्षानुवर्षे हाताने कोरून आणि शुद्ध तुळशीच्या लाकडापासून या माळा तयार केल्या जातात. परंतु, यंत्रावर तयार होणाऱ्या चायना माळांमुळे या पवित्र परंपरेला आणि स्थानिक रोजगाराला सुरुंग लागला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि भाविकांनी यावर विचार करून स्थानिक कारागिरांच्या हाताला काम देण्याची गरज निर्माण झाली आहे.