Wardha: Municipal Council Buildings दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यामुळे शहरातील जीर्ण इमारती कोसळून वित्तहानी झाल्याच्या घटना घडतात. धोका टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शहरातील १३२ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित इमारतींची तातडीने दुरुस्ती करावी किंवा आवश्यक असल्यास त्या पाडाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नगर रचना विभागाने शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये १३२ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. या इमारतींच्या मालकांना नोटीसा देऊन तातडीने उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यानंतरही इमारतींची दुरुस्ती किंवा पाडकाम न केल्यास भविष्यात होणार्या कोणत्याही दुर्घटनेसाठी संबंधित इमारत मालकच जबाबदार राहतील. अशा वेळी नगर परिषद प्रशासनाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. दरम्यान, शहरातील अनेक जीर्ण इमारतींचे मालकी हक्काचे वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या पाडण्यास प्रशासनाला अडचणी येत आहेत. काही मालकही जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आली आहे.