अनिल कांबळे,
नागपूर,
young-woman-sexually-assaulted : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणीत पीडित तरुणी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सन २०२५ मध्ये निलडोह येथील रियो केमिकल कंपनीत कामाला होती. त्याच कंपनीत आरोपी राजकुमार यादव हाही काम करत होता. कामाच्या ठिकाणी दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये नियमित भेटीगाठी व मोबाईलवरून संवाद सुरू झाला. दरम्यान, आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन देत एका ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेळोवेळी पीडितेच्या घरी, इतर ठिकाणी तसेच आरोपीच्या मूळ गावी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या काळात आरोपी पीडितेच्या आई-वडिलांसोबतही राहत होता. २ जुलै २०२६ रोजी दुपारी पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिची आई तिला अंगणवाडीतील आशा सेविकेकडे घेऊन गेली. आशा सेविकेच्या सल्ल्यानुसार तिला वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर तरुणी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी राजकुमार यादव याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.