चंद्रपूर,
Accused arrested with pistol येथील रेल्वे स्थानक परिसरातील मुन्ना कॅन्टीनजवळून पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसांसह अटक केली. दिलशान काजी सादीक काजी उर्फ धीरज मोहन दयाल (30, रा. सपना टॉकीज जवळ, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे.
10 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यावेळी रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेल्या मुन्ना कॅन्टीनच्या बाजूला, जलनगर वॉर्ड येथे एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी उभा असून, आपल्याजवळ घातक बेकायदेशीर शस्त्र बाळगून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकासह तात्काळ त्या परिसरात सापळा रचून धाड टाकली आणि संबंधित संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या पथकाने त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेले एक लोखंडी पिस्तूल आणि पॅन्टच्या पाठीमागील खिशात जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी आरोपीकडून 25 हजार रुपये किमतीची एक जुनी वापरती बनावटीची लोखंडी पिस्तूल, 2 हजार 500 रुपये किमतीची एकूण 5 नग जिवंत काडतुसे आणि 10 हजार रुपये किमतीचा एक भ्रमणध्वनी, असा एकूण 37 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी धीरज दयाल उर्फ दिलशान काजी याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात अपराध कलम 3, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पुढील सखोल तपासाकरिता रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक योगेश हिवसे, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले व सुनील गौरकार, हवालदार सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, शरद कुडे आदींनी केली. आरोपीने शस्त्र कुठून आणले आणि त्याचा नेमका काय बेत होता, याचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.