अफगाण-भारताचा डीएनए एकच

तालिबान सरकारच्या मंत्र्यांची टिप्पणी, भारतीय नागरिक कुटुंबातील सदस्य

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
काबुल,
afghan indian dna is the same पाकिस्तानसोबत सातत्याने बिघडत चाललेल्या संबंधांच्या पृष्ठभूमीवर, अफगाणिस्तानने भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचा आपला इरादा दर्शवला आहे. भारत दौऱ्यावर असलेले अफगाणिस्तानचे कृषी, सिंचन आणि पशुसंवर्धन मंत्री, मौलवी अताउल्ला ओमारी यांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांची उघडपणे प्रशंसा केली. भारत आणि अफगाणिस्तानचा डीएनए समान आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 

afghan indian dna is the same
 
भारतात आल्यावर मला माझ्याच देशात आणि माझ्याच लोकांमध्ये असल्यासारखे वाटले. किंबहुना भारतीय नागरिक आमच्या कुटुंबातील सदस्यच आहे. भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे अफगाणिस्तानचे कृषी, सिंचन आणि पशुसंवर्धन मंत्री, मौलवी अताउल्ला ओमारी यांनी म्हटले आहे. राजधानी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित भारत-अफगाणिस्तान व्यापार संधी उद्योग संवादात्मक सत्राला संबोधित करताना, ओमारी म्हणाले, मी पहिल्यांदाच भारत भेटीवर आलो आणि येथील आदरातिथ्याने भारावून गेलो.
 
भारतात माझ्या आगमनाच्या पहिल्या दिवसापासून, भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि मी भेटलेल्या प्रत्येकाने माझे आपुलकीने स्वागत केले. मला असे वाटले की, मी माझ्याच देशात आहे. आमचे संबंध केवळ राजनैतिक संबंधांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सामायिक इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेवर आधारित आहेत. भारतात मिळालेला सन्मान अफगाणिस्तानच्या लोकांसाठी चांगल्या भविष्याची आशा आहे. आपला समाज जवळपास ८० टक्के शेती, सिंचन आणि पशुपालनावर अवलंबून आहे. आता या क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची वेळ आली आहे आणि भारत आमच्यासाठी महत्त्वाचा भागीदार आहे.
  
गुंतवणुकीसाठी सहकार्य करावे
ओमारी म्हणाले की, आर्थिक विकासासाठी अफगाणिस्तानला जगभरातील देशांसोबत सहकार्य वाढवायचे आहे. गुंतवणूक, कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, सिंचन आणि क्षमता बांधणी या क्षेत्रांमध्ये भारतीय उद्योगांनी गुंतवणूक करून अफगाणिस्तानला सहकार्य करावे. भारत आमचा महत्त्वाचा भागीदार असून, संकटाच्या काळात त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे मदत केली.
 
 
पाकिस्तानला दे धक्का
सीमावाद, सुरक्षा समस्या आणि राजकीय मतभेदांमुळे अफगाण आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव विकोपाला गेला असताना त्यांची भारतासोबतची भागीदारी प्रादेशिक राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे हा पाकिस्तानसाठी मोठा दणका आहे. दरम्यान, भारत-अफगाणिस्तान संयुक्त समितीच्या बैठकीत दोन्ही देशांनी मानवतावादी मदत, विकास प्रकल्प, अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा, शिक्षण, क्रीडा, व्यापार, क्षमता बांधणी आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे.