अथेन्स,
airplane window shattered mid-air ग्रीसमधून जर्मनीकडे जाणाऱ्या रायनएअरच्या विमानात उड्डाणादरम्यान खिडकीची काच फुटल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. सुमारे ३० हजार फूट उंचीवर ही घटना घडली. खिडकीजवळ बसलेल्या ६१ वर्षीय प्रवाशाचा डोका आणि खांदा बाहेर ओढला गेला. मात्र पत्नीच्या प्रसंगावधानामुळे आणि इतर प्रवाशांच्या मदतीमुळे त्याचा जीव वाचला.ही घटना मॅसेडोनियाच्या हवाई हद्दीत घडली. संबंधित विमानाने ग्रीसमधील थेस्सलोनिकी येथून सकाळी ५.५५ वाजता उड्डाण केले होते आणि ते जर्मनीतील मेमिंगेनकडे जात होते. उड्डाण सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला आणि विमानाच्या केबिनमधील हवेचा दाब झपाट्याने कमी झाला. त्यानंतर ऑक्सिजन मास्क आपोआप खाली आले आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
घटनेच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. अचानक झालेल्या आवाजानंतर किंचाळ्या ऐकू आल्या. खिडकीजवळ बसलेला ६१ वर्षीय प्रवासी जोरदार हवेच्या दाबामुळे बाहेरच्या दिशेने खेचला गेला. त्यावेळी त्याची पत्नीने तात्काळ त्याचे पाय घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर इतर एका प्रवाशाने मदत करत त्याला सुरक्षितपणे पुन्हा केबिनमध्ये ओढून घेतले. प्रवाशाने सीटबेल्ट लावल्यामुळे तो पूर्णपणे बाहेर फेकला जाण्यापासून वाचल्याचे सांगण्यात आले.
माहितीनुसार, जखमी प्रवाशाला भाजल्याच्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. जखमी प्रवासी सर्बियाचा पर्यटक असल्याची माहितीही देण्यात आली आहे. ग्रीक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंजिनाच्या एका भागामुळे खिडकीची काच फुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. घटनेनंतर विमानाने तातडीने थेस्सलोनिकी विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यात आले. उर्वरित प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी रायनएअरने दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली असून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.