बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
गाझियाबाद,
Body of 7-year-old girl found in mall प्रदेशातील गाझियाबाद येथील नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजनगर एक्स्टेन्शन परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी पोलिसांनी अपहरण, सामूहिक बलात्कार, हत्या आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत मुलगी आपल्या कुटुंबासह संबंधित मॉलच्या बांधकामस्थळी राहत होती. तिचे कुटुंब मूळचे बिहारचे असून ते मॉलच्या बांधकामाच्या कामात कार्यरत आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी आणि तेथील कामगारांनी तिचा शोध सुरू केला. मात्र अनेक तास शोध घेतल्यानंतर रात्री सुमारे १ वाजता मॉलच्या तळमजल्यावर तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
 
 

Body of 7-year-old girl found in mall 
 
तपासादरम्यान मुलीचे अपहरण करून तिला फूस लावून नेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि बांधकाम सुरू असलेल्या मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली असून फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या पथकानेही पुरावे गोळा केले आहेत. या घटनेबाबत माहिती देताना एसीपी प्रियाश्री पाल यांनी सांगितले की, राजनगर एक्स्टेन्शनमधील बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच नंदग्राम पोलीस घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली असून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलित करण्यात आले आहेत. या प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.