Bor Tiger Reserve बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघ दिसत असल्याने पर्यटकांचा ओढा या व्याघ्र प्रकल्पाकडे वाढला आहे. या व्याघ्र प्रकल्पाला ३० जूनपर्यंत १७ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट देत जंगल सफारीचा आनंद लुटला. त्यातून बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला ६२ लाखांचा महसूल मिळाला आहे.
सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघांची संख्याही जास्तच आहे. शिवाय बिबट, अस्वल यासह तृण व मांस भक्षी वन्य प्राण्यांची संख्याही मोठी आहे. या व्याघ्र प्रकल्पातील पट्टेदार वाघांची एक झलक बघण्यासाठी पर्यटक येथे येतात. १ ऑक्टोबरला बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील जंगल सफारीचे बोरधरण येथील गेट तर अडेगाव येथील गेट २७ डिसेंबरपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. मान्सून कालावधीमुळे ३० जूनला कोअर जंगल सफारीचे दोन्ही गेट बंद करण्यात आले.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३० जूनपर्यंत दुप्पट पर्यटकांनी बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्याने जंगल पर्यटनातूनही दुप्पट महसूल प्रशासनाला मिळाल्याचे सांगण्यात आले.