राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आर. चेझीयान यांचे निधन

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
चेन्नई,
Director R. Chezhiyan passes away दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर आर. चेझीयान यांचे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ५७व्या वर्षी निधन झाले. वास्तववादी चित्रपटांसाठी ओळख असलेल्या चेझीयान यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या एका संवेदनशील दिग्दर्शकाला चित्रपटविश्वाने गमावले आहे.आर. चेझीयान यांनी दिग्दर्शित केलेल्या 'टू लेट' या चित्रपटामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती. भाड्याचे घर मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा या चित्रपटातून वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आली होती. प्रभावी कथानक आणि वास्तवाशी जवळीक साधणाऱ्या मांडणीमुळे या चित्रपटाला देश-विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवांत गौरव मिळाला.
 
 
 
Director R. Chezhiyan passes away
 
'टू लेट' या चित्रपटाला २३व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय भाषेतील स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. या सन्मानात 'गोल्डन बंगाल टायगर' ट्रॉफी, सात लाख रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्राचा समावेश होता.चेझीयान यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे वास्तववाद. 'टू लेट' या चित्रपटात त्यांनी जाणीवपूर्वक पार्श्वसंगीताचा वापर टाळला होता. तमिळ चित्रपटांमध्ये संगीताला विशेष महत्त्व असतानाही त्यांनी वेगळी वाट निवडली. एका मुलाखतीत त्यांनी चित्रपट वास्तवाच्या जितका जवळ जातो, तितके पार्श्वसंगीताचे महत्त्व कमी होत जाते, असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या विचारसरणीची चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा झाली होती.
 
 
सिवगंगा जिल्ह्यातील नट्टारसनकोट्टई येथे जन्मलेल्या आर. चेझीयान यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पी. सी. श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी 'थेनमेर्कू परुवाकात्रू', 'परदेसी' आणि 'जोकर' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.चित्रपट निर्मितीबरोबरच त्यांनी नवोदितांना घडवण्याचेही महत्त्वपूर्ण काम केले. 'द फिल्म स्कूल' या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना चित्रपटनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी आज चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आर. चेझीयान यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, वास्तववादी सिनेमाला नवी दिशा देणारा एक संवेदनशील दिग्दर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.