मुंबई,
fdas swift crackdown ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात बेकायदेशीर औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. ८ ते १० जुलैदरम्यान राज्याच्या विविध भागांत टाकलेल्या छाप्यांत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच रुग्णांना औषध खरेदीची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांमधील मेडिकल स्टोअर्सचे परवानेही रद्द करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने छ. संभाजीनगरमध्ये मे. कृपामाई हेल्थकेअर प्रा. लि.चा परवाना रद्द केला़ सोलापुरात नोबल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकल स्टोअरला व्यवसाय बंदचा आदेश देण्यात आलेा तसेच बीडमध्ये भ्रामक दावे करणाऱ्या गोरेपणाच्या क्रिमची विक्री करणाऱ्या मे. मंगलमुर्ती एजन्सीजवर कारवाई करण्यात आली़
अन्न व औषध प्रशासन आणि नाेंदेड पाेलिसांनी ९ जुलैला नांदेडमध्ये मे. अफराह कलेक्शन या दुकानावर छापा टाकला. या ठिकाणी पाकिस्तानात उत्पादित आणि बंदी असलेल्या ‘गोरी ब्युटी क्रिम’, ‘फेस फ्रेश ब्युटी क्रिम’, ‘उजुबा एक्स्ट्रा व्हाईट’ आणि ‘गोल्ड ग्लिम’ या सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा आढळला. या मालाची कोणतीही खरेदी बिले दुकानदाराकडे नव्हती. एफडीएने यातील तीन नमुने तपासणीसाठी पाठवले असून, उर्वरित ३९.७० लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे.
पुण्यात ५०.३६ लाखांची विनापरवाना औषधे जप्त
पुण्यातील शुक्रवार पेठेत ‘कल्पतरू आयुर्वेद’ या पेढीवर औषध निरीक्षकांनी छापा टाकून विनापरवाना भस्म आणि रस औषधांची विक्री उघडकीस आणली. जप्त केलेल्या प्लास्टिक पिशव्या, बरण्या आणि बाटल्यांवरील भस्म साठ्यावर बॅच क्रमांक, उत्पादन/मुदतबाह्य तारीख, उत्पादकाचे नाव आणि परवाना क्रमांक अशी कोणतीही अनिवार्य माहिती नव्हती. प्रो. राकेश राजेश शिर्के या औषधांची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे दाखवू शकले नाहीत. त्यामुळे एफडीएने ५०.३६ लाख रुपयांचा संशयास्पद साठा जप्त केला आहे.