गोंडप्लॉटचा रस्ता सावत्र का?

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
पावडे चौक ते वंजारीही वाट पाहतोय्
 
वर्धा, 
Gondplot Road वर्धेचा विकास पारिजातक झाला आहे. त्याच्या विकासाचा सुगंध सर्वत्र दरवळतो आहे. रस्ते, गल्ल्या आणि बोळा सिमेंटच्या झाल्या आहेत. परंतु, पश्चिम आणि पूर्व वर्धेला कमी अंतराचा असलेला गोंडप्लॉटचा रस्ता शासन दरबारी सावत्र की काय असा प्रश्न पडू लागला आहे. या रस्त्याने सहज आणि सोपे जाणे जिकरीचे झाले आहे. वर्धा शहर विकासाच्या बाबतीत आता आघाडीवर गेले आहे. त्याचा विकास आता कोणीही थांबवू शकत नाही. शहर नखशीकांत सजण्याकडे वाटचाल करीत आहे. परंतु, शहरातील दोन, अडीच रस्ते मात्र शहराच्या विकासाला ‘काळा डाग’ ठरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून पावडे चौकात जाणारा गोंडप्लॉटमधील हा रस्ता वर्धेकरांना मनस्ताप देणारा ठरत आहे. रामनगरकडील भाग ते आरती चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणारा हा रस्ता वर्धेच्या विकासाला अडसर ठरतो आहे. या रस्त्यावरील खड्डे गेल्या तीन चार वर्षांपासुन जीवंत आहेत.
 
 
Gondplot Road
 
पावसाळ्यात त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. गणेश स्थापना ते दुर्गोत्सवाच्या सुरुवातीला नगर पालिका प्रशासन त्या खड्ड्यांमध्ये कधी मुरुम टाकते. उन्हाळ्यापर्यंत ती टिकते. उन्हाळ्यात त्या रस्त्यावर धुळीचा प्रचंड त्रास वाहन चालकांना आणि त्या भागातील रहिवाश्यांना होतो. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून चारचाकी वाहन गेल्यास रस्त्यावरील डबक्यातील पाणी घरावर नक्षीकाम करतात. या रस्त्या त्यालाच समांतर असलेला हवालदारपुरा भागातील भोगे आलूबोंडा परिसरातील रस्ताही तसाच झाला आहे. या दोन्ही रस्त्यांहून जाताना दुचाकी चालक, सायकलस्वार विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. या दोन्ही रस्त्यावर रोज छोटे अपघात होता आहेत. याशिवाय पावडे नर्सिंग होम चौक ते वंजारी चौकापर्यंतचा रस्त्याही शहरातील विकासाला लाज वाटेल असे खड्डेमय झाला आहे.
गोंडप्लॉट रस्त्यासाठी १ कोटी ६० लाख
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पावडे नर्सिंग होम चौकासाठी १ कोटी ६० लाखाचा निधी मंजूर झाला असुन टेंडरही निघाले आहे, अशी माहिती वरुण पाठक यांनी दिली. हा निधी मंजूर झाला. टेंडरही निघाले तर पावसाळ्यापुर्वी रस्त्याचे काम सुरू करायला कोणती मांजर आडवी गेली, असा प्रश्न उस्स्थित होतो. पावसाळ्यापूर्वी काम सुरू झाले असते तर किमान विद्याथ्र्यांना त्रास सहन करावा लागला नसता.