लॉर्ड्सवर हरमनप्रीतचा 'विक्रमी' चौकार!

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
लंडन,
harmanpreets record breaking इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ५८ धावांची संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळी करत तिने लॉर्ड्सवर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) बनण्याचा मान मिळवला. याच खेळीदरम्यान हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या ९००० धावांचाही टप्पा पूर्ण केला.
 
harmanpreets record breaking
 
लॉर्ड्सवर तिन्ही प्रकारांमध्ये अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये आता हरमनप्रीत कौरचे नाव चौथ्या क्रमांकावर नोंदले गेले आहे. तिच्यापूर्वी श्रीलंकेचे कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार युनिस खान यांनी हा पराक्रम केला होता. भारताकडून स्मृती मंधानाने लॉर्ड्सवर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत अर्धशतके झळकावली असली, तरी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तिची सर्वोच्च धावसंख्या ३८ इतकीच आहे. पुरुष क्रिकेटमध्ये युवराज सिंगने या मैदानावर एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांत अर्धशतके झळकावली होती, मात्र त्याला लॉर्ड्सवर कसोटी खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
 
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया या दोघीही स्वस्तात माघारी परतल्या आणि संघाची अवस्था ३७ धावांत दोन बाद अशी झाली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. जेमिमाने ३५ धावांचे योगदान दिले. पुढे मंधाना आणि हरमनप्रीत यांनी चौथ्या विकेटसाठी ८९ धावांची भक्कम भागीदारी रचत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. दीप्ती शर्मानेही ५७ धावांची उपयुक्त खेळी केली. भारतीय फलंदाजांच्या या योगदानाच्या जोरावर संघाने पहिल्या डावात सर्वबाद २८५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिवसअखेर इंग्लंडने एका विकेटच्या मोबदल्यात २१ धावा केल्या असून सामन्यात भारताने सुरुवातीचे वर्चस्व मिळवले आहे.