काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी दफन! VIDEO

हिजबुल कमांडरची कॅमेऱ्यासमोर मोठी कबुली

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
इस्लमबाद,
Hizbul commander makes major confession हिजबुल मुजाहिदीनचा उप-सर्वोच्च कमांडर शमशेर खान याचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते आणि अनेक जण तेथे मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शमशेर खान म्हणतो की, लोलाब, कुपवारा ते कठुआपर्यंत काश्मीरमध्ये अशी एकही दफनभूमी नाही, जिथे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अवशेष दफन केलेले नाहीत. या व्हिडिओमध्ये शमशेर खान पाकिस्तान आणि काश्मीर यांच्यातील संबंधांवरही भाष्य करताना दिसतो. पाकिस्तान आणि काश्मीरमधील नात्यात कोणीही दुरावा निर्माण करू शकत नाही, असा दावा त्याने केला. हा व्हिडिओ ८ जुलै रोजी मुझफ्फराबाद येथे जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमादरम्यान चित्रीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
 
major confession
 
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोपोरच्या पंजल्ला भागात हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित घोषित गुन्हेगाराची मालमत्ता जप्त केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीची ओळख रोहामा रफीबाद येथील गुलाम मोहम्मद भट उर्फ हैदर अशी पटली होती. तपासात तो बेकायदेशीरपणे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन शस्त्रे आणि दारुगोळ्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो बंदी घालण्यात आलेल्या हिजबुल मुजाहिदीन संघटनेशी संबंधित असून पाकिस्तानमधून कार्यरत असल्याचेही पोलिसांनी म्हटले होते.
 
 
 
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आयोजित भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख केला. भारताच्या संरक्षण क्षमतेवर जगाचा विश्वास वाढत असल्याचे सांगताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान दहशतवाद्यांच्या तळांवर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख केला. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर झालेले स्फोट केवळ त्या भागापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगाने अनुभवले, असेही मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.