बहामासमध्ये भीषण विमान अपघात; १० ठार

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
नासाऊ,
Horrific plane crash in the Bahamas बहामासमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेनंतर सरकारने फ्लेमिंगो एअरच्या सर्व उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी नासाऊच्या पश्चिमेकडील समुद्रातील नॉर्थ अँड्रोस परिसरात हा अपघात घडला. अपघातानंतर बहामासचे पंतप्रधान फिलिप ब्रेव्ह डेव्हिस यांनी सुरुवातीला एका प्रवाशाला वाचवण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी त्या जखमी व्यक्तीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची पुष्टी केली. मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
 
 
 
Horrific plane crash in the Bahamas
 
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान डेव्हिस म्हणाले की, बहामासच्या स्वातंत्र्याच्या ५३ व्या वर्धापनदिनाच्या दिवशीच देशावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात आप्तस्वकीय गमावलेल्या सर्व कुटुंबीयांप्रती सरकारने संवेदना व्यक्त केल्या आहेत.बहामास विमान अपघात तपास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नासाऊ येथील लिंडन पिंडलिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सॅन अँड्रोसकडे निघालेले बहामासमध्ये नोंदणीकृत सेसना ४०२ हे छोटे विमान उड्डाणादरम्यान कोसळले. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.
 
 
ऊर्जा, उपयुक्तता आणि विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास पूर्ण होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून फ्लेमिंगो एअरचे विमानचालक प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी घडलेल्या दोन स्वतंत्र सुरक्षा घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.ऊर्जा, उपयुक्तता आणि विमान वाहतूक मंत्री जोबेथ कोल्बी-डेव्हिस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अपघातापूर्वी फ्लेमिंगो एअरच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. मायागुआनाकडे जात असताना वैमानिकाने अडचण असल्याची माहिती दिल्यानंतर विमान नासाऊकडे परत आणण्यात आले. विमान सुरक्षित उतरले, मात्र त्यानंतर त्याला आग लागली. या घटनेतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्या घटनेचीही स्वतंत्र चौकशी सुरू आहे.