वॉशिंग्टन,
iran attempting to develop nuclear weapons अमेरिकेसोबत १४-कलमी सामंजस्य करारावर स्वाक्षरी जून महिन्यात केल्यानंतर काही दिवसांतच इराणने अण्वस्त्रे विकसित करणे सुरू केल्याची माहिती उपग्रह छायाचित्रातून समोर आली आहे. इराणमधील अणु केंद्रावर हालचाली वाढल्याच्या प्रतिमा समोर आल्याने, सध्याच्या लष्करी संघर्षापूर्वीच इराणने कराराचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेसोबत झालेल्या करारात अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न न करण्याचे इराणने वचन दिले होते, मात्र कराराच्या काही दिवसांतच त्यांनी अण्वस्त्रे विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे उपग्रह प्रतिमेतून समोर आले. ‘इन्स्टिट्यूट फॉर सायन्स ॲण्ड इंटरनॅशनल सिक्युरिटी’च्या सहकार्याने प्रसारित करण्यात आलेल्या उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणात असे दिसून आले की, इराण आपल्या अणुसुविधांची पुनर्बांधणी करीत आहे. त्यांनी अण्वस्त्र विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रतिमा समोर आल्याने, सध्याच्या लष्करी संघर्षापूर्वीच इराणने कराराच्या उल्लंघनाचा दावा अमेरिकन माध्यमांनी केला आहे. जून आणि जुलै महिन्यातील नवीन उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून येते की, तेथे बांधकाम पुन्हा सुरू झाले आहे. जूनमध्ये, जेव्हा करार लागू होता, तेव्हा इराणने हवाई हल्ल्यांमुळे पडलेले खड्डे तात्पुरत्या आच्छादनांनी झाकले होते. जुलैपर्यंत, या आच्छादनांच्या जागी धातूची जाळी लावण्यात आली, ज्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
उद्ध्वस्त भागाची पुनर्बांधणी
अहवालानुसार, इराणच्या दोन सर्वांत प्रमुख संशयित स्थळांवर रहस्यमय हालचाली आढळून आल्या. त्यात परचीन अणुकेंद्राचा समावेश आहे. हे ते स्थळ आहे जिथे अणुबॉम्बसाठी लागणारे स्फोटक साहित्य साठवलेले असल्याचा संशय आहे. इराणने या स्थळाभोवती काँक्रीटचे संरक्षक कवच उभारले आहे. दुसरे स्थळ पिकॅक्स माउंटन आहे. हा डोंगराळ प्रदेश देखील इराणच्या अणुकार्यक्रमाचा एक अत्यंत गुप्त आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. डोंगरात बांधलेल्या बोगद्यांमधून संशयास्पद वाहने सतत ये-जा करत असल्याचे दिसून आले आहे.
क्षेपणास्त्र तळांची दुरुस्ती
अहवालात म्हटले की इराणच्या मुख्य अणुभट्ट्या इस्फहान, फोर्डो आणि नतान्झ येथील क्षेपणास्त्र साठवण केंद्रांची दुरुस्ती सुरू केली आहे. इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेबद्दल नेहमीच चिंता व्यक्त केली आहे, या तळांची पुनर्बांधणी धोक्याचा इशारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही : नेतान्याहू
इराणला कोणत्याही परिस्थितीत अणुबॉम्ब तयार करू देणार नाही आणि गरज पडल्यास पुन्हा लष्करी कारवाई करण्यास इस्रायल मागे-पुढे पाहणार नाही, असा कठोर इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला. संघर्ष अद्याप संपलेला नसून, पुढील काही दिवसांत नव्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिणाम भोगावे लागतील : झोलघद्र
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहम्मद बाघेर झोलघद्र यांनी इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर कोणताही हल्ला झाल्यास इस्रायलला त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. इराणवरील हल्ला सहन केला जाणार नाही आणि इस्रायललाही त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.