इराणचा बदल्याचा 'हुंकार' जगाचे लक्ष वेधणारा

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
तेहरान,
irans roar of retaliation इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अद्यापही कायम असून, दोन्ही देशांकडून एकमेकांविरोधात कठोर भूमिका घेतली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका बाजूला इराणशी चर्चेची तयारी दर्शवली असली, तरी दुसऱ्या बाजूला कठोर लष्करी कारवाईचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.
 
  
वडील आणि माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारानंतर प्रसिद्ध केलेल्या आपल्या पहिल्याच संदेशात मोजतबा खामेनी यांनी, "वडिलांच्या निर्दोष रक्ताचा बदला घेणे ही संपूर्ण राष्ट्राची इच्छा आहे," असे ठामपणे म्हटले. अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. फेब्रुवारीच्या अखेरीस युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचाही जीव गेला. त्यानंतर इराणकडून अमेरिका आणि इस्रायलविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेतली जात असून, बदला घेण्याची भाषा अधिक तीव्र झाली आहे.
 
दरम्यान, तणाव कमी करण्यासाठीही काही हालचाली सुरू आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे होर्मुझ सामुद्रधुनीसंदर्भातील चर्चेसाठी ओमानमध्ये पोहोचले आहेत. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत सामंजस्य करारातील (एमओयू) आश्वासनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्यास अमेरिका इराणवर एक हजार क्षेपणास्त्रे डागेल आणि त्यानंतर आणखी हजारो क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर अंतरिम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत, अमेरिकेच्या कृती त्यांच्या दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात असल्याचे म्हटले.
 
याचदरम्यान, इराणने अमेरिकेच्या हल्ल्यात नुकसान झालेला गोलेस्तान प्रांतातील अक्काला काउंटीमधील पूल अवघ्या २४ तासांपेक्षा कमी कालावधीत दुरुस्त करून पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला आहे. गोलेस्तानचे राज्यपाल अली-असगर तहमास्बी यांनी हा निर्णय शत्रूच्या धमक्यांना आणि हल्ल्यांना दिलेले प्रत्यक्ष उत्तर असल्याचे सांगितले.