स्वातंत्र्य मिळवणार, अन्यथा मृत्यू पत्करणार

‘जेएएसी’च्या नेत्यांची पाकिस्तानला धमकी

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
बुधवारी काढणार ‘लाँग मार्च’
 
लष्कराला व्याप्त काश्मिरातून हुसकावून लावणार
 
मुझफ्फराबाद,
jaac leaders threaten pakistan पाकिस्तानी सरकार आणि लष्कराविरोधात अखेरचा लढा देण्याची वेळ आली आहे, १५ जुलै रोजी रावलकोट येथून मुझफ्फराबादच्या दिशेने लाँग मार्च काढला जाईल, मागण्या पूर्ण न झाल्यास भारतीय सीमेकडे कूच करणार आहे. व्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देणार अन्यथा मृत्यू पत्करण्यास तयार आहे. लष्कराच्या दबावापुढे कदापि झुकणार नाही. त्यांनी आंदोलनात अडथळा आणल्यास आमच्या भूभागातून हुसकावून लावू अशी धमकी ‘जॉईंट आवामी एक्शन कमेटी’चे (जेएएसी) नेते सरदार अमान खान यांनी दिली आहे.
 
 
jaac leaders threaten pakistan
 
जेएएसीच्या नेतृत्वात व्याप्त काश्मिरात महिनाभरापासून सुरू असलेले आंदोलन उधळण्याचे पाकिस्तानी लष्कराचे सर्व प्रयत्न धुळीस मिळाले आहे. त्यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक निदर्शकांची हत्या केली. मात्र, व्याप्त काश्मिरातील लोक डगमगले नाही. आंदोलन दडपण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखला, आमच्या नेत्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल करीत तुरुंगात डांबले. आता व्याप्त काश्मीर मुक्त करू अन्यथा मृत्यूला सामोर जाण्याची तयारी लाखो नागरिकांनी केली आहे. १५ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चमध्ये पाच लाख लोक सहभागी होणार आहेत. पाकिस्तानी लष्कराने गोळ्या झाडल्या तरी माघार घेणार नाही. मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही भारतीय सीमेकडे कूच करू आणि सुरक्षा दलाला आमच्या भूभागातून हुसकावून लावून भारतीय सीमा व्याप्त काश्मीरसाठी खुली करणार असल्याचा इशारा जेएएसीचे नेते सरदार अमान खान यांनी निवेदनातून दिला.
  
आंदोलकांना घाबरले सरकार
पाकिस्तानी सरकारने १५ जुलैचे आंदोलन दडपण्यासाठी व्याप्त काश्मिरात चार हजारपेक्षा अधिक अतिरिक्त सैनिक तैनात केले आहे. याशिवाय सात रेंजर्स विंग्सच्या तुकड्या सीमेवर पाठवल्या आहे. व्याप्त काश्मिरातील गृह विभागाने केलेल्या विनंतीवरून अतिरिक्त सैनिक तैनात केल्याची माहिती पाकिस्तानी संरक्षण विभागाने दिली आहे. आंदोलकांना घाबरून रावलकोट ते मझफ्फराबादपर्यंत मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले.
 
 
नागरिकांवर उपासमारीचे संकट
व्याप्त काश्मिरातील आंदोलन बळाच्या जोरावर दडपण्यात अपयशी झालेल्या पाकिस्तानी सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद केला आहे. व्याप्त काश्मीरच्या सीमेवर धान्यासह विविध वस्तू घेऊन जाणारे शेकडो ट्रक दोन आठवड्यांपासून थांबले आहे. पर्यायाने येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर, धान्य, भाजीपाला, दूध, औषधीसह विविध वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
 
आंदोलकांच्या हल्ल्यात १२ पोलिस ठार
व्याप्त काश्मीरकडे जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या सहा ट्रकला आग लावण्यात आली. तसेच, आंदोलकांनी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला आणि पोलिसांची वाहने जाळली, त्यात १२ पोलिस ठार झाले, तर अनेक जखमी आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर आंदोलकांवर मोठ्या प्रमाणावर हिंसक कारवाई करण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचारी, व्यापाऱ्यांचा पाठिंबा
जेएएसीच्या आंदोलनाला विविध विभागातील कनिष्ठ सरकारी, शिक्षक, व्यापारी, वकिल संघटना, कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी देखील १५ जुलैच्या लाँग मार्चमध्ये सहभागी होण्याची घोषणा केल्याने पाकिस्तानी सरकारच्या अडचणी वाढल्या आहे.