आता प्रत्येक देशाच्या नजरेत 'कांडू'

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
श्रीनगर,
jammu-kashmir जम्मू-काश्मीरमधील २०१३ च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणात राज्य तपास संस्था (एसआयए) काश्मीरला मोठे यश मिळाले आहे. हिजबुल मुजाहिदीनचा घोषित दहशतवादी आणि संघटनेचा कमांडर इम्तियाज अहमद कांडू याच्या विरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमुळे आंतरराष्ट्रीय यंत्रणांना कांडूचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेणे आणि भारतात प्रत्यार्पित करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करणे शक्य होणार आहे.
 
jammu-kashmir
 
बारामुल्ला जिल्ह्यातील तरझू येथे २०१३ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार पोलीस जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी सुरुवातीला सोपोरमधील तरझू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २०२४ मध्ये या प्रकरणाचा तपास राज्य तपास संस्था (एसआयए) काश्मीरकडे सोपवण्यात आला. सोपोरमधील करालतांग येथील रहिवासी असलेला इम्तियाज अहमद कांडू हा २०१० पासून बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिदीनचा सक्रिय सदस्य आणि कमांडर म्हणून कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे. भारत सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याला 'निर्दिष्ट वैयक्तिक दहशतवादी' म्हणून घोषित केले होते.
 
एसआयएने साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीचे सखोल विश्लेषण करून तपास पूर्ण केला. नव्याने समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त कलमे जोडण्यात आली आणि जुलै २०२४ मध्ये सक्षम न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध सविस्तर आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणातील सहा आरोपींपैकी हंदवारा येथील कलामाबादचा तारिक अहमद मीर आणि सोपोरमधील बटापोराचा कयूम नज्जर हे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. तर सोपोरचे जावेद अहमद मट्टू, रौफ नज्जर आणि श्रीनगरच्या दलाल मोहल्ला येथील अहमदउल्ला मल्ला यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मुख्य आरोपी इम्तियाज अहमद कांडू मात्र फरार असून तो पाकिस्तानात आश्रय घेतल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एसआयएच्या तपासात कांडूची दहशतवादी कारवायांमधील सक्रिय भूमिका स्पष्ट झाली आहे. तरझू हल्ल्याव्यतिरिक्त लक्ष्यित हत्या, शस्त्रे व दारूगोळ्याची तस्करी, अमली पदार्थांच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत तसेच १५ हून अधिक जणांचा मृत्यू झालेल्या घटनांसह किमान १० अन्य प्रकरणांमध्येही तो वाँटेड आहे.