जोगीसाखरा येथील तरुणांनी केली परिसराची स्वच्छता

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
आरमोरी, 
jogisakhara : swachh parisar सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत जोगीसाखरा येथील युवकांनी गावातील सार्वजनिक विहीर व परिसर श्रमदानातून स्वच्छ करून एक आदर्श उपक्रम राबविला. पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर विहिरीच्या आजूबाजूला वाढलेले गवत, झुडपे, काटेरी झाडे तसेच साचलेला कचरा काढण्यात आला. विहिरीत पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व इतर टाकाऊ वस्तू बाहेर काढून विहीर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली.
 
 
jogi sakhara
 
गावातील अनेक नागरिक या सार्वजनिक विहिरीतील पाण्यावर अवलंबून असल्याने विहिरीची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन युवकांनी स्वतःहून पुढाकार घेत श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमामुळे विहीर व परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक झाला असून ग्रामस्थांनी युवकांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
 
 
स्वच्छ परिसरामुळे पिण्याच्या पाण्याचा स्रोत सुरक्षित राहण्यास मदत होणार असून ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक मालमत्तेच्या जतनाबाबत जनजागृती होईल, असा विश्‍वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. गावाच्या विकासासाठी आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी जोगीसाखरा घडविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये युवकांनी सातत्याने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. युवकांच्या या उपक्रमामुळे गावात सामाजिक एकोपा आणि सार्वजनिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.