आता ‘त्या’अर्धवट पांदण रस्त्याने वाढविली शेतकर्‍यांची डोकेदुखी

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
- बोरगाव-सुखपूर ‘मातोश्री पांदण रस्ता’ : ना पायदळ, ना वाहनांना मार्ग
 
गोंदिया, 
‘Matoshree Pandan Road Scheme’ गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुखपूर येथील गुमडोह जलाशयाच्या कालव्यावर सिंचन विभागाची पूर्वपरवानगी न घेता मातोश्री पांदण रस्ता योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेले पांदण रस्त्याचे बांधकाम आता शेतकर्‍यांसाठीच डोकेदुखी ठरले आहे. सिंचन विभागाने परवानगी मिळेपर्यंत काम थांबविण्याचे आदेश दिल्याने रस्ता अर्धवट अवस्थेत राहिला असून, त्यामुळे या मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. तसेच ट्रॅक्टरसह इतर शेतीची वाहनेही नेणे अशक्य झाले आहे.
 
 
pandhan rdksl
 
ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, या उद्देशाने शासनाने मातोश्री पांदण रस्ता योजना सुरू केली आहे. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून कामे होत असल्याने योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची चर्चा आहे. बोरगाव-सुखपूर येथेही सिंचन विभागाची मंजुरी न घेता गुमडोह कालव्यावर पांदण रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सिंचन विभागासह संबंधित यंत्रणांनी काम तातडीने बंद केले. मात्र, काम बंद झाल्याने निर्माण झालेली परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. अर्धवट अवस्थेतील रस्त्यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला असून, दैनंदिन शेतीकामांवर त्याचा परिणाम होत आहे. संबंधित विभागाची निष्काळजीपणा आणि नियमांची पायमल्ली करून काम करणार्‍या यंत्रणेमुळे ही परिस्थिती ओढविल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
 
 
कालव्यावरच निधी खर्च का?
स्थानिक शेतकर्‍यांच्या मते, बोरगाव-सुखपूर परिसरात आधीपासूनच पांदण रस्ते उपलब्ध असून त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची गरज आहे. असे असताना तुलनेने योग्य असलेल्या गुमडोह कालव्यावरील मार्गावरच पायवाट उभारण्यासाठी योजनेचा निधी खर्च करण्यात आला. यावरून या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार एजेंसी व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.