मुलींच्या विवाहावरील वक्तव्यावरून मौलाना रशीदी चर्चेत

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Maulana Rashidi Statements ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी अल्पवयीन मुलींच्या विवाहासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत देशाचा कारभार भारतीय संविधानानुसार चालतो, कोणत्याही धार्मिक कायद्यानुसार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी रशीदी यांच्या वक्तव्याचा निषेध करत संविधान मान्य नसल्यास अशा व्यक्तींनी भारतात राहण्याचा अधिकार नाही, असे म्हटले. भारतीय संविधानाचे पालन करणे प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक असल्याचे सांगताना त्यांनी, संविधान मान्य नसेल तर पाकिस्तानात जाण्याचा पर्याय निवडावा, अशी टीकाही केली.
 
 
 
fdg6u678
 
भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसेन यांनीही या विधानाला दुर्दैवी संबोधत त्याचा निषेध केला. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे संपूर्ण समाजाची बदनामी होत असल्याचे सांगत त्यांनी मौलाना रशीदी यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी केली.भाजप खासदार ब्रिजलाल यांनीदेखील रशीदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भारत हा संविधानावर चालणारा देश असून येथे शरियाच्या आधारे शासन होणार नाही, असे स्पष्ट केले. मुलींच्या विवाहाचे वय आणि बलात्काराच्या घटनांचा संबंध जोडणारे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. शरियाचा वारंवार उल्लेख करून समाजात चुकीचा संदेश दिला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी काही दिवसांपूर्वी मुलींच्या विवाहाला उशीर झाल्यामुळे बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप केला. आपण कधीही १८ वर्षांखालील मुलींच्या विवाहाचे समर्थन केले नसून, राजकीय हेतूने आपले विधान संदर्भाबाहेर काढून चुकीच्या पद्धतीने मांडले जात असल्याचा दावा त्यांनी केला.