आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा
देवळी
MLA Rajesh Bakane आ. राजेश बकाने यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या आरोग्यविषयक मागण्यांवर चर्चा केली. पुलगाव येथे स्वतंत्र महिला व शिशु रुग्णालयाची स्थापना, पुलगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर, देवळीपुलगाव मतदारसंघातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मांडली.
पुलगाव व परिसरातील हजारो नागरिक, माता-भगिनी, नवजात बालके आणि ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी वर्धा, नागपूर येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि जीविताचा धोका वाढतो. त्यामुळे पुलगाव येथे महिला व शिशु रुग्णालय सुरू झाल्यास माता व बालकांवर वेळेवर उपचार उपलब्ध होतील. पुलगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यास खाटांची संख्या वाढणे, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध होऊन देवळीपुलगाव मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
आ. बकाने यांनी यापूर्वीही सभागृहात या विषयाची प्रभावीपणे मांडणी करून शासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित प्रस्तावांचा नियमानुसार विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनीही प्रस्तावांची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.