बुलढाणा,
MLA Sanjay Gaikwad बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एक लाख वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प आ. संजय गायकवाड यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेत जाहीर केला. पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रात वाढ आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भेटीदरम्यान आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान राबविण्याची रूपरेषा वनमंत्री गणेशराव नाईक यांच्यासमोर मांडली. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विकासाला चालना देत सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, ग्रामपंचायत परिसर, रस्त्यांच्या दुतर्फा तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने व्यापक वृक्षलागवड करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी वनमंत्री गणेशराव नाईक यांनी आ. संजय गायकवाड यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एक लाख वृक्ष लागवडीच्या संकल्पासाठी वन विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. रोपे, तांत्रिक मार्गदर्शन तसेच इतर आवश्यक बाबींमध्ये शासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी ग्वाही दिली.
आ. संजय गायकवाड यांनी यावेळी सांगितले की, वृक्ष लागवड ही केवळ मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याची सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या भेटीप्रसंगी राज्यातील विविध मतदारसंघांतील आमदार, लोकप्रतिनिधी तसेच मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.