वॉशिंग्टन,
Open Hormuz - Trump अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला असून, होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासनाने इराणला २४ तासांची मुदत दिली आहे. या कालावधीत इराणने होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली ठेवण्याची आणि त्यांच्यावर कोणतेही हल्ले होणार नसल्याची अधिकृत घोषणा करावी, अशी स्पष्ट मागणी अमेरिकेने केली आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही अमेरिकेकडून देण्यात आला आहे.ॲक्सिऑसच्या अहवालानुसार, हा संदेश इराणपर्यंत थेट तसेच प्रादेशिक मध्यस्थांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आला आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इराणने दिलेल्या मुदतीत अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही, तर त्याचे परिणाम त्यांच्यासाठी प्रतिकूल ठरू शकतात.

अमेरिकेची भूमिका अशी आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग मिळाला पाहिजे. तसेच या मार्गावर कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा टोल आकारला जाणार नाही, याची सार्वजनिक हमी इराणने द्यावी. याशिवाय यापूर्वी घडलेल्या घटनांबाबत आपली भूमिका चुकीची होती, हेही इराणने मान्य करावे, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे.अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, गेल्या महिन्यात झालेल्या सामंजस्य कराराचे उल्लंघन इराणने केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल दोन लष्करी कारवाया केल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ओमानची राजधानी मस्कत येथे इराण आणि ओमानच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या चर्चेत होर्मुझ सामुद्रधुनीतील नौकानयनाची सुरक्षितता आणि व्यापारी जहाजांचे संरक्षण हा प्रमुख विषय असणार आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हेही या बैठकीसाठी ओमानमध्ये दाखल होणार असून, हा दौरा गेल्या एक-दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेचाच भाग असल्याचे इराणी सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने वाहतूक केली जाते. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवाईनंतर इराणने हा सामरिक जलमार्ग प्रभावीपणे बंद केला होता. त्यामुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आता या मार्गावरील सुरक्षित आणि निर्बाध जलवाहतुकीची स्पष्ट हमी इराणने द्यावी, यासाठी अमेरिका आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.