पुणे,
Parth Pawar and Kayanat Dhar's engagement पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा २९ जुलै रोजी पुण्यात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह पार पडला होता. त्यानंतर आता पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली आहे.रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात धार यांनी एकत्र उपस्थिती लावल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत दोघेही या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.
कायनात धार या मूळच्या हरियाणातील असून सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. पवार कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही महिन्यांत त्या पार्थ पवार यांच्यासोबत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात दोघांनी एकत्र दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांच्या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.पवार कुटुंबातील विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही कायनात धार यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्या बारामतीत पवार कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. तसेच मुंबईतील वरळी येथे आयोजित शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती.