मुंबई,
Pushkar Jog's 'Antaral' अभिनेता पुष्कर जोगच्या आगामी हिंदी चित्रपट 'अंतराल'च्या चित्रीकरणाला युनायटेड किंगडममध्ये सुरुवात झाली आहे. प्रेम, रहस्य आणि थरार यांचा संगम असलेल्या या ब्रिटिश-भारतीय क्रॉसओव्हर चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.पुष्कर जोगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर चित्रपटाच्या सेटवरील क्लॅपबोर्डचा फोटो शेअर करत नव्या प्रवासाची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने 'अंतराल' हा युनायटेड किंगडममध्ये चित्रित होणारा हिंदी हॉरर-रोमँटिक ड्रामा असल्याचे सांगितले. तसेच या चित्रपटात अभिनेत्री अनिसा बट त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचेही स्पष्ट केले.
'अंतराल'ची निर्मिती 'गुसबम्प्स एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली होत असून, ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्माते तेजा सलादी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर छायांकनाची जबाबदारी निखिल रानडे यांनी सांभाळली आहे.विविध प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी ओळख असलेले पुष्कर जोग नेहमीच वेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निवड करत आले आहेत. 'अंतराल'मधूनही तो एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी पुष्कर जोगवर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, या नव्या प्रकल्पाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या युनायटेड किंगडममध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, येत्या काही आठवड्यांत कलाकार, कथा आणि प्रदर्शनासंदर्भातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.