दोघे गंभीर जखमी
तिघांना अटक
मंगरूळनाथ,
Sattur attacks at Mangalnath शहरातील बस स्टँड समोर असलेल्या विराट पान सेंटर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन सत्तुर व दगडाने करण्यात आलेल्या हल्लयात दोन भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना ९ जुलै रोजी घडली. या प्रकरणी मंगरूळनाथ पोलिसांनी पाच आरोपी व दोन अनोळखी महिलांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, तिन आरोपींना आज, ११ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे.
(संग्रहित छायाचित्र )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल नागोराव सिनगारे (वय ३०) रा. वरुड बु. ता. मंगरूळनाथ हे आपला भाऊ अंकुश सिनगारे यांच्यासह विराट पान सेंटरवर उभे असताना आरोपींनी अंकुश यांना खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विशाल यांनी जाब विचारताच आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्कयांनी व दगडाने मारहाण केली. एका आरोपीने हातातील सत्तूरने विशाल व अंकुश या दोघांवर सपासप वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान नातेवाईक अजय काळू सिनगारे यांनी घटनास्थळाचा व्हिडिओ दाखविल्यानंतर आरोपींची ओळख पटली. त्यानुसार उमेश रमेश इंगोले, मंगेश रमेश इंगोले, दिनेश उर्फ डेब्या रमेश इंगोले, रमेश इंगोले तसेच दोन अनोळखी महिला विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि सोळंके करीत आहे.