वर्धा,
Shankar Prasad Agnihotri धकाधकीच्या जीवनात कराटे हा खेळ स्वसंरक्षणाचे एक उत्तम साधन आहेच सोबतच कराटे खेळाला शासकीय व निमशासकीय भरतीत ५ टक्के खेळाडू आरक्षण असल्यामुळे खेळाडूंनी नियमित सराव करून राज्य, राष्ट्रीय पदक प्राप्त करून शासकीय नोकरीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.
ते अग्निहोत्री कॉलेज परिसरात स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे संचालक पवन तिजारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा कला महोत्सवचे अध्यक्ष संदीप चिचाटे, महात्मा फुले प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी पाटील, संतोष सेलूकर, मोहन मोहिते, सहसाचिव हरीश पाटील, निखील सातपुते, प्रवीण पेठे, सचिन झाडे, अभिजित रघुवंशी, प्रशांत येंडे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, अलीकडेच काही माजी खेळाडूंनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेत, विशेषतः आयपीएससारख्या जबाबदार पदांवर प्रवेश मिळवून एक नवे उदाहरण निर्माण केले आहे. खेळाडूंनी केवळ मैदानापुरते मर्यादित न राहता समाज, सुरक्षा आणि शिस्त या क्षेत्रांतही योगदान द्यावे असे ते म्हणाले. खेळाडूंनी ‘फक्त विजेते’ न होता देशसेवक बनावे, हीच काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. संचालन नीता मोहर्ले यांनी केले तर आभार मनीषा राऊत यांनी मानले.