मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
समुद्रपूर,
sheti karjmafee महायुती सरकारने जाहीरनाम्यात शेतकरी कर्ज माफी देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनांची पूर्तता करीत २ लाखांपर्यंत शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. आता कर्जमाफीची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. मात्र, यामध्ये अनेक अटी शर्ती लावल्याने विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये शेतकर्यांप्रती सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर कुणावार, आ. रणधीर सावरकर, आ. नारायण कुचे, आ. हरिश पिंपळे यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या दालनात भेट घेऊन कर्जमाफी संबंधी घातलेल्या अटी शर्ती वगळून शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी लावून धरली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणीची दखल घेत विधानसभेत कर्ज माफी संबंधी घातलेल्या अटी शर्ती वगळून शेतकर्यांची कर्ज माफी करण्याची घोषणा केली. यामध्ये प्रामुख्याने २०१९ मध्ये महात्मा फुले कर्जमाफी ज्या शेतकर्यांना कर्जमाफी झाली होती त्यांना ५० हजार रुपये अनुग्रह राशी देण्यात येणार होती, आता त्यांना सुद्धा २ लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. तसेच २०२६-२७ चा नियम सुद्धा वगळण्यात आला आहे. या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल आ. कुणावार म्हणाले की, महायुती सरकारने कर्ज माफी करून शेतकर्यांना मोठा दिलासा दिला होता. मात्र, यातील अटी शर्ती वगळाव्यात, अशी मागणी सत्ताधारी आमदारांच्या शिष्टमंडळाने केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणी लक्षात घेऊन अटी शर्ती वगळून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असेही आ. कुणावार म्हणाले.