पावसासाठी शेतकर्‍यांचे देवाला साकडे

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
पिकांना तुषारचा आधार
कोरडवाहू शिवारातील पिके धोक्यात
 
वाशीम, 
Sprinkler irrigation जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावून बळीराजाला दिलासा देणार्‍या पावसाने आता अचानक दडी मारली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा थेंबही पडला नाही. ऐन वाढीच्या अवस्थेत असलेली पीके आता पाण्याच्या अभावी संकटात सापडली आहेत. विशेषतः सुरुवातीला पेरणी झालेल्या कपाशी व सोयाबीनचे पिक कोमेजू लागल्याने शेतकर्‍यांची चिंता कमालीची वाढली आहे.
 
 
kapas
 
डोळ्यांदेखत पीक जळून जाऊ नये म्हणून ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी भर पावसाळ्यातही तुषार सिंचनाचा आधार घेत पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. जिल्ह्यात ज्या शेतकर्‍यांकडे विहीर किंवा बोअरवेलसारखी सिंचनाची साधने उपलब्ध आहेत, ते कपाशी व सोयाबीनला पाणी देऊन पीक जगवत आहेत. मात्र, जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. कपाशी व सोयाबीनचे पीक सध्या वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून, या काळात त्याला पाण्याची नितांत गरज असते. नेमक्या याच वेळी पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजाच्या चेहर्‍यावर आता चिंतेचे ढग दाटून आले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
 
जिल्ह्यात २१,८२७ हेक्टरवर कपाशीचा पेरा
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात यावर्षी १० जुलैपर्यंत एकूण २१,८२७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक लागवड कारंजा तालुक्यात झाली असून, रिसोड तालुक्यात सर्वात कमी पेरा नोंदवला गेला आहे.
 
 
जमिनीचा ओलावा टिकवून ठेवा
येथील कृषी तज्ञाच्या सल्ल्यानुसार ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तूर्तास आंतरमशागत टाळावी. पाण्याची उपलब्धता असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे हलके सिंचन करावे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन खत व फवारणीचे नियोजन करावे. पिकांमध्ये ताण दिसून आल्यास कृषी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.