समुद्रपूर,
khursapar forest कधी कुणामुळे काही वाईट तर कधी चांगले घडेल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार गिरड परिसरातील खुर्सापार जंगलात घडला. एका वाघिणीमुळे या जंगलाला व्याघ्र सफारी प्रकल्पाचं वैभव प्राप्त झाले. दोन वर्षांपूर्वी जिच्या नावाने गिरड-खुर्सापार परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्याच वाघिणीची आज जंगलाची ‘राणी’ म्हणून ओळख झाली आहे. दोन वर्षांपूर्वी ४ आणि ३ महिन्यांपूर्वी ४ अशा आठ पिल्लांना तिने जन्म दिला. आता ती वाघीण जंगलाचे वैभव झाले असुन ती नकोशी झालेली आता ‘राणी’ झाली आहे.

आधीच्या चार पिलांपैकी एकाचा धोंडगावजवळ अपघातात मृत्यू झाला तर दोघांना जेरबंद करून त्यांचे थलांतर करण्यात आले. उर्वरित एक आता परिसरात वास्तव्यास आहे. तीन महिन्यांपूर्वी पुन्हा या वाघिणीने ४ छाव्यांना जन्म दिला असून ती पिलांसोबत खुर्सापारच्या जंगलात संचार करत आहे. एकेकाळी वाघिणीच्या आणि तिच्या तीन पिलांच्या वारंवार हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता होती. जनावरांवरील वाढते हल्ले आणि मानवी वस्तीजवळील वावरामुळे या संपूर्ण कुटुंबाचे दुसर्या जंगलात स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे शेवटी वाघांच्या संपूर्ण कुटुंबाला जेरबंद करण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार वनविभागाने विशेष मोहीम राबवून जवळपास तीन महिने प्रयत्न केले. या काळात दोन पिलांना जेरबंद करण्यात यश आले; मात्र त्यापूर्वी एका पिलाचा अपघाती मृत्यू झाल्याने वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला होता. या सर्व घडामोडींनंतर वाघिणीला गिरड-खुर्सापारच्या जंगलात अधिक सुरक्षित आणि पोषक अधिवास लाभला. तिने पुन्हा चार पिलांना जन्म दिला. चार महिन्यांची पिल्लं आता आईच्या सान्निध्यात जंगलात बागडत आहेत.
दरम्यान, आ. समीर कुणावार व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या संकल्पनेतून गिरड-खुर्सापार परिसरातील व्याघ्र सफारी प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली आहे.khursapar forest आज गिरड-खुर्सापारचे जंगल केवळ वाघांचे अधिवास नसून, विदर्भातील उदयोन्मुख वन्यजीव पर्यटनाचे आकर्षण ठरण्याची क्षमता बाळगून आहे. एकेकाळी ‘नकोशी’ वाटणारी ही वाघीण खर्या अर्थाने खुर्सापार जंगलाची शान आणि गिरडच्या जंगलाची राणी बनली आहे.